अन्नाचे औषध म्हणून सेवन करा : डॉ. श्रीराम नायकरे   

टिळक महाराष्ट्र विद्यापीठात जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा

पुणे : अन्न हे केवळ चवीनुसार न निवडता, ते औषध म्हणून सेवन करणे आवश्यक आहे. दैनंदिन आहारात प्रथिने, फायबर, जीवन सत्त्वे यांचा समावेश असलेला नैसर्गिक आणि संतुलित आहार घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्रीराम नायकरे यांनी केले.
 
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सीआयईडी विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि इंडो कंपास या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रम टिमविच्या इंदूताई टिळक सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त सुरेश अन्नापुरे, फुड क्रॉप्ट बँक्वेटचे संचालक गुरुविंदर सिंग बिंद्रा, तसेच सीआयईडी विभागाचे समन्वयक डॉ. सिद्धार्थ श्यामप्रमुख उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाच्या विविध विभागांतील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अन्न सुरक्षा विषयक जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांच्या फेरीचे आयोजनदेखील करण्यात आले होते.
 
डॉ. नायकरे यांनी रस्त्यावरील अन्नाचे धोके स्पष्ट करताना सांगितले की, रस्त्यावर मिळणारे अन्न अनेकदा अस्वच्छ असते, ज्यामध्ये भेसळ व आरोग्याला हानी पोहोचवणारे घटक आढळतात. दुधामध्ये डिटर्जंट, स्टार्च, फॉर्मेलिनयांसारख्या घातक रसायनांचा वापर होतो, ज्यामुळे मूत्रपिंड व पचनसंस्थाबाधित होऊ शकते. त्यामुळे अन्न हे दीर्घकालीन आरोग्य लक्षात घेऊनच निवडावे, असे त्यांनी सांगितले.
 
विद्यार्थ्यांनी अन्नपदार्थाचा पोत व चव यामधील फरक ओळखून अन्नाचे सेवन करावे, तसेच विश्वसनीय ब्रँड किंवा प्रमाणित डेअरीकडूनच दुग्धजन्य पदार्थ खरेदी करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.सहआयुक्त सुरेश अन्नापुरे म्हणाले, अन्न हे पूर्णब्रह्म असून ते केवळ तांत्रिक नव्हे, तर मानवी मूल्यांवर आधारित विषय आहे. अन्न सुरक्षा ही शेतीपासून ते ग्राहकापर्यंतच्या साखळीत पाळली गेली पाहिजे. अन्न व औषध प्रशासन विभाग भेसळयुक्त अन्नाविरोधात सातत्याने मोहिमा राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. जबाबदार ग्राहक बनणे व निरोगी आहाराचे जाणकार समर्थक होणे हे काळाची गरज आहे, असेही अन्नापुरे यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन अनुजा पालकर यांनी केले.

Related Articles