प्राधान्यक्रम बाजारपेठांवर भारत-अमेरिकेत चर्चा   

वाणिज्यमंत्री गोयल यांच्याकडून स्पष्ट

पॅरिस : भारत आणि अमेरिकेमध्ये द्विपक्षीय व्यापार करार करण्यासाठी प्राधान्यक्रम असलेल्या बाजारपेठांना अधिक महत्त्व दिले जाईल, असे वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी सोमवारी सांगितले आहे. तसेच या विषयावर दोन्ही देशांत चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेबुवारीत अमेरिकेचा दौरा केला होता. तेव्हा त्यांनी बहुविध द्विपक्षीय व्यापार करार हा दोन्ही देशांसाठी फायदेशीर असा व्हावा व त्यावर चर्चेची अपेक्षा व्यक्त केली होती. करार सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार आहे. २०३० पर्यत व्यापार १८१ अब्ज डॉलर्सवरुन ५०० अब्ज डॉलर्सपर्यत वाढविण्याचे ध्येय ठेवले असल्याचे सांगितले होते. आता दोन्ही देश एकत्र काम करणार आहेत. प्राधान्यक्रम असलेल्या बाजारपेठांवर चर्चा करतील. त्या दिशेने द्विपक्षीय करार करण्याचे काम केले जाईल, असे पियूष गोयल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गोयल यांनी फ्रान्स दौर्‍यात राजधानी पॅरिस येथे नेते आणि उद्योगपतींशी चर्चा केली. फ्रान्स आणि भारत यांच्यात व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्याबाबत देखील चर्चा केली.  

थांबा आणि पाहा...

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियमवरील शुल्कात ५० टक्के वाढ केली आहे. त्याबाबतच्या प्रश्नावर गोयल म्हणाले, दोन्ही देश एकत्र काम करुन प्रश्न मार्गी लावतील. थांबा आणि पाहा, असे सांगताना ते म्हणाले, सर्व प्रश्न द्विपक्षीय चर्चेने सोडविले जातील. 
 

Related Articles