वर्षभरात पीएमआरडीएकडे ३५० तक्रारी   

सर्व तक्रारी निरसन झाल्याचा प्रशासनाचा दावा

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या विभागाच्या जवळपास ३५० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये अतिक्रमण बांधकाम व निर्मूलन विभाग, जमीन व मालमत्ता विभाग तसेच, विकास परवानगी विभागाच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचे दिसून येते. काही तक्रारी या कार्यालयात देखील देण्यात आलेले आहेत. तर, केंद्र शासनाच्या पीजी पोर्टल अर्थात प्रशासकीय सुधारणा आणि लोक शिकायत या पोर्टलवर ५४ तक्रारी प्राप्त झालेले आहेत.
 
पीएमआरडीएचे वेगवेगळे ११ विभाग आहेत. त्यामध्ये अतिक्रमण बांधकाम व निर्मूलन विभाग, प्रशासन विभाग, विकास परवानगी विभाग, नियोजन विभाग, अभियांत्रिकी १ आणि २, अग्निशामन नियंत्रण विभाग, जमीन व मालमत्ता विभाग त्याचप्रमाणे वित्तीय विभाग आणि दक्षता विभाग देखील कार्य करीत आहे. 
 
पीएमआरडीएमध्ये पिंपरी-चिंचवड, पुणे आणि ग्रामीण भागाचा मोठा परिसर जोडला आहे. नऊ तालुक्याचा कारभार आहे. दरम्यान, आकुर्डी आणि औंध या दोन ठिकाणी कार्यालय आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध कामांसाठी या कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागतात. एकाच वेळी कामे होत नसल्याने नाईलाजाने नागरिकांना तक्रारी कराव्या लागत आहेत. त्यातच अतिक्रमण झाल्याबाबत, दस्त अथवा कागदपत्रे न मिळण्याबाबत, बांधकाम परवाना मंजुरी  विलंब होणेबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. मात्र या तक्रारी तातडीने संबंधित विभागाला पाठवून त्याचे निरसन करत असल्याची माहिती प्रशासन विभागाने दिली.
 
प्रादेशिक आणि तालुकास्तरीय कार्यालयाला गती द्या
 
पीएमआरडीए प्रशासन चार प्रादेशिक आणि नऊ तालुकास्तरीय कार्यालये सुरू करणार आहे. आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पीएमआरडीए हद्दीचा विस्तार पाहता तेथील नागरिकांना कामानिमित्त आकुर्डी किंवा औंध कार्यालयात यावे लागू नये व त्यांची कामे त्यांच्या तालुक्यातच व्हावीत यासाठी पीएमआरडीए कार्यालयाचे विकेंद्रीकरण करण्याचा निश्चय केला आहे. पैकी तीन कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. बाकी कार्यालयासाठी ही जागा पहाणे सुरू असून त्या कामालाही गती देऊन नागरिकांची कामे त्यांच्याच तालुक्यात झाल्यास कामासाठी होत असलेल्या तक्रारी कमी होतील अशा प्रतिक्रिया नागरिकांच्यामध्यातून व्यक्त होत आहेत.

Related Articles