वसुंधरेसाठी ‘वनांचे श्लोक’ लोकांपर्यंत पोहोचवा   

रामदास पुजारी लिखित ‘पर्यावरणविषयक घोषवाक्ये’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : मनाचे श्लोक सांगून रामदास स्वामी यांनी मनःस्थिती बलवान केली तर ‘पर्यावरणविषयक घोषवाक्ये’ या पुस्तकातून वनांचे श्लोक मांडून वनाधिकारी रामदास पुजारी यांनी वसुंधरा सुस्थितीत ठेवण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे, असे विचार सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. शेषराव पाटील यांनी व्यक्त केले.साहित्यविश्व प्रकाशनद्वारा पुजारी लिखित ‘पर्यावरणविषयक घोषवाक्ये’ या पुस्तकाचे प्रकाशन वनभवनात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
 
याप्रसंगी पुण्याचे मुख्य वनसंरक्षक व कुंडल वनप्रबोधिनीचे महासंचालक एन.आर.प्रवीण प्रमुख पाहुणे होते. पंकज कुमार गर्ग, राम धोत्रे, रंगनाथ नाईकडे, रवी वानखडे, नानासाहेब लडकत, यशवंत पाटील, बबनराव हगवणे, मनोहर सैंदाणे, दीपक पवार, प्रा. विजय लोंढे, लक्ष्मण शिंदे व प्रकाशक विक्रम शिंदे उपस्थित होते.एन.आर.प्रवीण म्हणाले, कमी शब्दांमध्ये प्रभावी संदेश देण्याचे सामर्थ्य घोषवाक्यांमध्ये आहे. रामदास पुजारी यांचे पुस्तक पर्यावरण जनजागृतीसाठी महत्वपूर्ण राहील.
 
पकंज गर्ग म्हणाले, पर्यावरणविषयक बाबी जतन केल्या तर भविष्यात त्याचे फार चांगले फायदे मिळतील.रंगनाथ नाईकडे म्हणाले, दासबोध आणि ज्ञानेश्वरीत निसर्ग संवर्धनाचा उल्लेख आहे.रामदास पुजारी म्हणाले, पर्यावरण व वसुंधरेचे रक्षणासाठी वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन यासाठी जनजागृती आवश्यक आहे. सूत्रसंचालन प्रा. विजय लोंढे यांनी केले. विक्रम शिंदे यांनी आभार मानले.

Related Articles