राज्यात आज वादळी पाऊस   

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट 

पुणे : मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कायम आहे. आज (गुरूवारी) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 
 
दरम्यान, दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, मालदिवचा कोमोरीन भाग, बंगालचा उपसागर तसेच मध्यम बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून दाखल झाला आहे. संपूर्ण श्रीलंका मान्सूनने व्यापली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. रत्नागिरी, सधिुदुर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट विभागात मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटात ताशी ५० ते ६० कि.मी. वादळी वार्‍यासह पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 
 
नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, बीड, छ. संभाजीनगर येथेही जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. ताशी ५० ते ६० कि.मी. वेगाच्या वादळी वार्‍यासह खुप जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. धुळे, नदुरबार, लातूर, सांगली, जालना, धाराशिव, बीड या भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. अकोला, नागपूर, अमरावती, यतमाळ, अकोला या भागातही मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

मान्सून वेळेआधीच केरळात 

यंदा हवामान विभागाच्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) नियोजित वेळेआधीच केरळात दाखल होणार आहे. याआधी २००९ मध्ये मान्सून २३ मे रोजी देवभूमी केरळात दाखल झाला आहे. 
 
यावर्षी मान्सून वेळेआधीच केरळात दाखल झाल्यास सुमारे १६ वर्षांनंतर पुन्हा एकदा मान्सून वेळेआधी केरळात दाखल झाल्याची नोंद होणार आहे. मान्सूनच्या पुढील वाटचालीला पोषक स्थिती कायम आहे. त्यामुळे दोन दिवसांत मान्सून केरळाद दाखल होणार आहे. 

कोकणात रेड अलर्ट

येत्या ४८ तासात कोकणातील बहुतांश भागात मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मागील चार दिवसांपासून कोकणातील विविध भागात पावसाचा जोर कायम आहे. तेथे ताशी ५० ते ६० कि.मी. वेगाने वारे वाहत असल्यामुळे विविध प्रकारची झाडे कोसळून पडली आहेत. पावसाला सुरूवात झाल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर न पहण्याचे आवाहन भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

पुण्यात दुसर्‍या दिवशीही जोरदार पाऊस

पुणे शहर आणि उपनगरात मंगळवारी जोरदार पाऊस पडल्यानंतर बुधवारी रात्री मेघगर्जना, वीजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यानंतर रात्री आकाशात ढग दाटून आले. कात्रज, मागडेवाडी, हडपसर या भागात जोरदार पाऊस पडला. तर मध्य वस्तीतील पेठांमध्ये  मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. रात्री उशीरापर्यंत पाऊस कायम होता. आज जिल्ह्यातील घाट विभागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात ताशी ५० ते ६० कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. 
 
सिंहगड रस्ता आणि मिठानगर भागात महापालिका प्रशासनाकडून शासनाने पाणी काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. उपनगरामध्ये पावसाचा जोर अधिक होता. रात्री उशिरा पाऊस आल्यामुळे वाहतुकीची समस्या जाणवली नाही. शहरात मात्र अनेक भागांमध्ये वीज गेल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. महापालिका प्रशासनाकडून सुमारे साडेसातशे कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनासाठी तैनात करण्यात आले आहेत. हवामान विभागाकडून संध्याकाळी साडेआठ वाजता पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, मात्र शहराच्या ठराविक भागातच पावसाने जोरदार हजेरी लावली.
 

Related Articles