रेल्वे स्थानक परिसरात बॉम्ब ठेवल्याची धमकी   

पुणे : रेल्वे स्थानक, येरवडा आणि भोसरी परिसरात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा निनावी फोन बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला आला. या धमकीच्या फोननंतर पोलिसांनी ताबडतोब पुणे रेल्वे स्थानकासह येरवडा आणि भोसरी परिसरात शोधमोहिम सुरू केली. परंतु, पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.
 
पोलिस नियंत्रण कक्षाच्या ११२ या आपत्कालीन क्रमांकावर बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फोन केला. पुणे रेल्वे स्थान, भोसरी आणि येरवड्यातील नवचैतन्य महिला मंडळ या तीन ठिकाणांना बॉम्बने उडवणार असल्याची धमकी या व्यक्तीने फोनवरून दिली. पोलिसांना आलेल्या या धमकीच्या फोननंतर तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली.
 
पुणे पोलीस, रेल्वे संरक्षण दल, स्थानिक लोहमार्ग पोलीस, बॉम्ब शोध पथक, बंडगार्डन पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि श्वान पथक यांनी विविध ठिकाणी शोध घेतला. परंतु, त्यांना कुठेही कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळली नाही. ही धमकी फसवी असल्याचे निष्पन्न झाले. तरीही, खबरदारी म्हणून रेल्वे स्थानकावरील सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
 

Related Articles