अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ   

मुंबई, (प्रतिनिधी) : ११ वीच्या ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ३ जून पर्यंत मुदत देण्यात आली होती.  महाविद्यालयाच्या इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी सरकारने काही बदल केल्याने प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठीची मुदत ५ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत वाढवण्यात येत असल्याचे प्रभारी शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी जाहीर केले.
 
इन-हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित असतील. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालय-वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळाकरीता एक युनिट ग्राह्य धरण्यात येत आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांकरीता त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा- कनिष्ठ महाविद्यालय-वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसूली जिल्ह्यांमध्ये एक यूनिट इन-हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे. एकूण १० लाख ८५ हजार ८५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून पुणे विभाग- १,८७,९२५; मुंबई विभाग- २,६५,९००; कोल्हापूर विभाग- १,०७,०१२; छत्रपती संभाजीनगर विभाग- १,००,०४०; नाशिक विभाग- १,१२,१०८; नागपूर विभाग- ९५,२१०; अमरावती विभाग- ९८,३५९; लातूर विभाग- ५८,५८५ आणि इतर- ६१,७१२ अशी नोंदणी झाली. 

Related Articles