महिलांचे दागिने चोरणारे चारजण ताब्यात   

तीन गुन्हे उघड, पावणेचार लाखाचा ऐवज जप्त

भोर, (प्रतिनिधी): पुणे-सातारा महामार्गावर शिवरे गावच्या हददीत प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे हिसकावून चोरी केलेल्या चारजणांच्या टोळीला पकडण्यात यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलिसांनी ही कारवाई केली. अनिकेत गोपाळ सुरवसे (वय२२), आकाश सतिश बिरादार, सुदर्शन नामदेव यादव सर्व (रा. ए.एम. कॉलेजसमोर, मांजरी,पुणे) हर्ष सतिश जाधव (वय २३, रा.हिंजवडी, पुणे) अशी ताब्यात घेतलेल्यांची नांवे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सव्वाचार तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे, दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. त्यापैकी बिरादार व जाधव यांनी यवत व बारामती पोलीस ठाण्याच्या हददीत गुन्हे केल्याचे कबूल केले आहे.
 
या गुन्ह्यातील फिर्यादी केशरी कुशल भोईर (वय ३१, रा.धोंडपाडा, कोपरोली, ता. पेण जि.रायगड) व त्यांचे नातेवाईक २५ एप्रिल रोजी मांढरदेवीच्या दर्शनासाठी मोटारवाहनातून जात होते. शिवरे येथे पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गाडी थांबवली होती. त्यावेळी फिर्यादी मोटारीबाहेर येउन थांबल्या होत्या. दरम्यान दोन अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवरून येउन फिर्यादीच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिणे हिसकावून पळवले होते. त्याचा गुन्हा राजगड पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. 
 
गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेउन तत्कालीन पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक गणेस बिरादार यांनी तपासाच्या सूचना दिल्या. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगडचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ताजीराव मोहीते व त्यांच्या  सहकार्‍यांनी गुन्ह्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले. गोपनीय खबर्‍याकडून मिळालेल्या  माहितीमध्ये अनिकेतचे नाव निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर उर्वरीत तीघांना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक गवळी करीत आहेत.

Related Articles