सौदी अरेबिया अमेरिकेत करणार ६०० अब्ज डॉलरची गुंतवणूक   

रियाध : सौदी अरेबिया अमेरिकेमध्ये ६०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चार दिवसांच्या आखाती देशांच्या दौर्‍यावर असून मंगळवारी रात्री ते सौदी अरेबियामध्ये दाखल झाले. त्यावेळी सौदी अरेबियाचे राज्यकर्ते युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. दोन्ही नेत्यांदरम्यान गुंतवणूकविषयक चर्चा झाली.
 
अमेरिका आणि सौदी अरेबियादरम्यान ऊर्जा, संरक्षण, खनिकर्म आणि अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्याविषयी करार करण्यात आले. त्यावर मोहम्मद बिन सुलेमान आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षर्‍या केल्या. यानुसार, अमेरिकेने सौदी अरेबियाला जवळपास १४२ अब्ज डॉलर मूल्यांच्या शस्त्रास्त्रांची विक्री करण्याचे मान्य केले. 
 
व्हाइट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने कोणत्याही देशाबरोबर केलेला हा सर्वात मोठा संरक्षण सहकार्य करार आहे. या करारांतर्गत अमेरिकेच्या दहापेक्षा जास्त संरक्षण कंपन्या हवाई आणि क्षेपणास्त्र संरक्षण, हवाई दल व अवकाश प्रगती, सागरी सुरक्षा व दूरसंचार या क्षेत्रांमध्ये व्यापार करणार आहेत.
 

Related Articles