अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री   

व्यक्ती विशेष : समृद्धी धायगुडे 

भारत आणि कॅनडामधील राजकीय संबंध काहीसे ताणलेले असतानाच एक नवा इतिहास घडत आहे. देशातील ओकविल ईस्टच्या खासदार अनिता आनंद यांना कॅनडाच्या नव्या परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आल्या. पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवून लिबरल पक्ष कॅनडामध्ये सत्तेत परतला. पक्षाला १६७ जागा मिळाल्या. हे बहुमताच्या १७२ च्या आकड्यांपेक्षा ५ ने कमी आहे. परंतु या सर्व पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एका हिंदू वंशाच्या महिलेला या प्रतिष्ठित पद कॅनडामध्ये मिळाले आहे. १३ मे च्या दिवशी भगवद्गीतेवर हात ठेवून त्यांनी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासह मणिंदर सिंधू, रुबी सहोता आणि रणदीप सराय हे सगळेही सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. टुड्रो यांच्या कारकिर्दीत खलिस्तान्यांचा संघर्ष पेटलेला होता. आता अनिता आनंद यांच्यासमोर परराष्ट्र मंत्री म्हणून एक नवे आव्हानच समोर उभे राहणार आहे. अनिता यांना एकीकडे भारतीय वंशाच्या आणि दुसरीकडे कॅनडा सारख्या देशाची जबाबदारी असल्याने भारत- कॅनडा संबंध सुधारण्याकडे दोन्ही देशातील नागरिकांचे लक्ष राहणार आहे. 
 
५८ वर्षीय अनिता इंदिरा आनंद यांची आई सरोज तमिळी तर वडील एस. व्ही. आनंद पंजाबी वंशाचे डॉक्टर होते. अनिता यांना गीता आणि सोनिया या दोन बहिणी आहेत.  लिबरल पक्षाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार त्यांना चार अपत्ये आहेत. अनिता इंदिरा आनंद या कॅनेडियन वकील, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी आहेत. त्यांनी आतापर्यंत कॅनडाच्या संरक्षण मंत्री, वाहतूक मंत्री आणि नवकल्पना, विज्ञान आणि उद्योग मंत्री म्हणून काम केले आहे. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त झालेल्या त्या पहिल्या हिंदू महिला देखील आहेत. 
 
आनंद यांचा जन्म नोव्हा स्कॉशियातील केंटविले येथे झाला. नोवा स्कॉटिया या ठिकाणी लहानाच्या मोठ्या झाल्या. क्वीन्स विद्यापीठ आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतले. २०१८ मध्ये त्या ओकविलच्या खासदार झाल्या,त्यावेळी 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये खासदार होणाऱ्या त्या पहिल्या हिंदू वंशाच्या नेत्या ठरल्या. अनिता आनंद या LGBTQIA+ अधिकारांना समर्थन देते. 
 
अनिता आनंद यांनी कोविड-१९ साथीच्या काळात आनंद यांनी कॅनडाच्या सार्वजनिक सेवा आणि खरेदी मंत्रालयाचे नेतृत्व केले. देशातील लस आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांच्या खरेदीचे व्यवस्थापन केले. त्यानंतर त्यांना संरक्षण मंत्रालय देण्यात आले. त्यावेळी त्यांनी कॅनडातील सैन्यदलांचे आधुनिकीकरण केले. आता परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे.
 
रशियाच्या युक्रेनवर युद्धात युक्रेनियन सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी लष्करी मदत आणि कर्मचारी पुरवण्याच्या योजनांचे देखील त्या नेतृत्व करत.अनिता इंदिरा आनंद या २०१९ ते २०२१ सार्वजनिक सेवा मंत्रालयाची जबाबदारी असताना कोरोना काळात कुणालाही लशी कमी पडणार नाहीत याची त्यांनी व्यवस्थित खबरदारी घेतली.आता विविध देशांशी असलेले व्यापार संबंध सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. 
 
परराष्ट्र मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी एक एक्स खात्यावरून एक पोस्ट केली त्यात असे म्हटले आहे,"कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल मला सन्मान वाटतो. पंतप्रधान मार्क कार्नी आणि आमच्या टीमसोबत एक सुरक्षित, न्याय्य जग निर्माण करण्यासाठी आणि कॅनेडियन लोकांसाठी सेवा देण्यासाठी मी उत्सुक आहे."
 
अनिता आनंद या कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री झाल्याने कॅनडा आणि भारत यांच्यातले बिघडलेले संबंध सुधारु शकतील अशी अपेक्षा आहे. कॅनडाचे अमेरिकेशी  संबंधही बिघडले आहेत. त्यामुळे परराष्ट्र मंत्री म्हणून अनिता आनंद यांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. मेलानी जोली यांना उद्योग मंत्री केले आहे. तर फ्रँकोईस फिलिप या अर्थमंत्रीच राहणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा विरोधात दाखवलेल्या आक्रमकतेचा प्रतिकार करु हे आश्वासन देऊन कार्ने यांनी ही निवडणूक जिंकली आहे.आता पुढे काय होणार हे पाहणे ही महत्वाचे आहे.
 
पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवून लिबरल पक्ष कॅनडामध्ये सत्तेत परतला. पक्षाला १६७ जागा मिळाल्या. तथापि, हे बहुमताच्या १७२ च्या आकड्यांपेक्षा ५ ने कमी आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये कॅनडामध्ये निवडणुका अधिकृतपणे होणार असल्या तरी, पंतप्रधान मार्क कार्नी यांनी गेल्या महिन्यात नवीन निवडणुकांची घोषणा केली आणि ट्रम्पशी सामना करण्यासाठी त्यांना मजबूत जनादेशाची आवश्यकता असल्याचे सांगितले. २०१५ पासून कॅनडाचे पंतप्रधान असलेले जस्टिन ट्रूडो यांनी या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर मार्क कार्नी यांची नवीन पंतप्रधान म्हणून निवड झाली.
 

Related Articles