पुस्तकांची मी सदैव ऋणी : रेणू गावस्कर   

पुणे :आयुष्याच्या संध्याकाळी पुस्तकांच्या सान्निध्यात मला रहावेसे वाटते. पुस्तकांमुळे माझी जडण-घडण झाली, त्यामुळे मी पुस्तकांची सदैव ऋणी आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका रेणू गावस्कर यांनी व्यक्त केले. 
 
वाचन संस्कार, संस्कृती आणि विचार यांच्या संवर्धनासाठी अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे दिनांक १० जूनपर्यंत  बालकुमार शब्दोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या शब्दोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी ज्येष्ठ रेणू गावस्कर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. अक्षरधारा बुक गॅलरीच्या कुसुमाग्रज वाचक कट्टा येथे झालेल्या कार्यक्रमात अक्षरधारा बुक गॅलरीचेे संचालक रमेश राठिवडेकर आणि रसिका राठिवडेकर उपस्थित होते. 
 
रेणू गावस्कर म्हणाल्या, आजही मला नवीन पुस्तकांचा वास हवाहवासा वाटतो. पुस्तकांच्या सहवासात मी रोमांचित होते. पुस्तके आणि लहान मुले यांच्या सहवासात राहणे हा माझा छंद आहे. हा छंद मला सकारात्मकता देतो. गेली ४० हून अधिक वर्ष माझ्या वाचनाचा हा यज्ञ कायम सुरू आहे. मी सगळ्या प्रकारची पुस्तके वाचते. पण इंग्रजी भाषेवर माझे जरा जास्त प्रेम आहे आणि त्यातील साहित्य मला खुणावत असते. वाचनामुळे मी समाजाभिमुख झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालक रसिका राठिवडेकर यांनी केले. अक्षरधारा बुक गॅलरीचेे संचालक रमेश राठिवडेकर यांनी आभार मानले.

Related Articles