छत्तीसगढमध्ये २२ नक्षलवादी ठार   

ऑपरेशन संकल्प अंतर्गत मोठे यश 

नवी दिल्ली /रायपूर : तेलंगणा आणि छत्तीसगढ सीमेवर ऑपरेशन संकल्प अंतर्गत मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत बुधवारी सुरक्षा दलाबरोबर उडालेल्या चकमकीत २२ नक्षलवादी ठार झाले आहेत. छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली. तेलंगणा आणि  छत्तीसगढ सीमेवरील जंगलातील पर्वतीय भाग कारेगुट्टा येथे काल सकाळपासून जोरदार गोळीबार सुरू होता. आतापर्यंत नक्षलवाद्यांचे २२ मृतदेह सापडले आहेत. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. २१ एप्रिलपासून ऑपरेशन संकल्प सुरू आहे. त्यामुळे एकूण ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या आता २६ झाली आहे. 
 
नक्षलप्रभावित बस्तर विभागात ऑपरेशन संकल्प सुरू आहे. आजपर्यत राबविण्यात आलेल्या मोहिमांपैकी ती सर्वात मोठी ठरली आहे. त्यात विविध दलांचे सुमारे २४ हजार सुरक्षा रक्षक सहभागी झाले आहेत. जिल्हा राखीव दल, बस्तर योध्दे, विशेष कृती दल आणि राज्य, केंद्रीय राखीव दलाचे जवान यांचा समावेश आहे. तसेच कोब्रा दलेही कारवाईत सहभागी झाली आहेत.  तेलंगणातील दनकरयाना झोनल कमिटी आणि तेलंगणा स्टेट कमिटी ऑफ माओईस्ट यांचा प्रभाव या परिसरात असल्याचा सुगावा सुरक्षा दलांना लागला होता. त्यानंतर कठोर कारवाईस प्रारंभ केला आहे. २४ एप्रिल रोज  पीएलजीए बटालियनच्या तीन महिला नक्षलवादी ठार झाल्या होत्या. त्यांना पकडून दिल्यास प्रत्येकी आठ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. कारेगुट्टा पर्वतीय भागात त्यांना ठार केेले होते तेथून मोठा शस्त्र आणि स्फोटकांचा साठा आणि विघातक साहित्य जप्त केले होते. माओवादी बटालियन १ चे घनदाट जंगली भागात वास्तव्य असल्याचे दिसून आले. कारवाईत अनेक वरिष्ठ नक्षलवादी म्होरके ठार झाल्याचा किंवा जखमी झाले आहेत. 
 

Related Articles