सोलर पॅनेलवर ३५२१ टक्के कर!   

वृत्तवेध

अमेरिकेने दक्षिण पूर्व आशियातील चार देशांतून येणार्‍या सौर पॅनेलवर ३,५२१ टक्के इतका मोठा कर लावण्याची घोषणा केली आहे. अमेरिकन सौरउत्पादक कंपन्यांनी सरकारला आवाहन केले, की विदेशी कंपन्या स्वस्त दरात ऑफर देऊन त्यांच्या बाजाराचे नुकसान करत आहेत, तेव्हा हे पाऊल उचलण्यात आले. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाच्या वर्षभराच्या तपासानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला, की अनेक चीनी कंपन्या कंबोडिया, मलेशिया, थायलंड आणि व्हिएतनाममध्ये उत्पादन करत आहेत आणि तेथून अमेरिकेत उत्पादने पाठवत आहेत. त्यामुळे अमेरिकन उद्योगांचे मोठे नुकसान होत आहे. तपासात सहकार्य न करणार्‍या कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. कंबोडियातील काही कंपन्यांवर ३,५२१ टक्के कर लावण्यात आला आहे. त्याचबरोबर मलेशियातील ‘जिनको सोलर’ या चीनी कंपनीच्या उत्पादनांवर ४१ टक्के कर लावण्यात आला असून थायलंडमधील ‘ट्रिना सोलर’च्या उत्पादनांवर ३७५ टक्के कर लावण्यात आला आहे.
 
या कंपन्या स्वस्त दरात उत्पादने पाठवत होत्या, म्हणजेच ‘डंपिंग’ करत होत्या आणि यामागे चीनच्या अनुदानाचा मोठा हात असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. या कररचनेमुळे अमेरिकन सौरउत्पादनाला निश्चितच फायदा होईल. अमेरिकन उत्पादकांच्या समूह ‘अमेरिकन अलायन्स फॉर सोलर मॅन्युफॅक्चरिंग’ने या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणतात, की यामुळे अमेरिकेची देशांतर्गत उत्पादन क्षमता मजबूत होईल. चीनी कंपन्या बर्‍याच काळापासून या प्रणालीचा फायदा घेत आहेत. २०२३ मध्ये, अमेरिकेने या चार देशांकडून सुमारे १२ अब्ज डॉलर (सुमारे १ लाख कोटी रुपये) किमतीची सौर उपकरणे आयात केली. त्यामुळे हा निर्णय केवळ व्यावसायिकच नाही, तर धोरणात्मकही मानला जात आहे. तथापि, त्याचे परिणाम सामान्य ग्राहक आणि लहान व्यावसायिकांवर होऊ शकतात. आतापर्यंत स्वस्त सौर पॅनेलचा लाभ मिळत होता. नवीन टॅरिफमुळे, सौर उत्पादनांच्या किमती वाढू शकतात आणि इंस्टॉलेशन महाग होऊ शकते. या निर्णयाची वेळही खास आहे. कारण अलीकडेच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी व्हिएतनाम, मलेशिया आणि कंबोडियाला भेट दिली. या देशांशी संबंध दृढ करणे आणि अमेरिकेच्या दबावाला तोंड देणे हा या भेटीचा उद्देश होता. अशा स्थितीत हा निर्णय दोन्ही देशांमधील वाढत्या व्यापार तणावातील आणखी एक दुवा असल्याचे दिसून येत आहे. चीनमधून येणार्‍या उत्पादनांवर अमेरिकेने यापूर्वीच १४५ टक्क्यांपर्यंत कर लावला आहे आणि आता काही बाबतीत हा एकूण कर २४५ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकन उत्पादनांवर १२५ टक्के कर लादून ‘शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा’ इशारा दिला आहे. हे केवळ सौर ऊर्जेबद्दल नाही, तर ही एक नवीन व्यापार युद्धाची सुरुवात असू शकते, ज्याचा संपूर्ण जगाच्या हरित ऊर्जा क्षेत्रावर परिणाम होईल.

Related Articles