दिल्लीला पावसाचा फटका   

 

तीन मुलांसह चौघांचा बळी 
 
नवी दिल्ली : दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक शहरांना शुक्रवारी मुसळधार पावसाचा फटका बसला. दिल्लीत महिला आणि  तीन मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील बळींची एकूण संख्या चार झाली.  पावसामुळे दिल्लीकडे येणारी तीन विमाने जयपूर, अहमदाबादकडे वळविण्यात आली. २०० हून अधिक विमानांचे वेळापत्रक कोलमडले. उत्तर प्रदेशाला  पावसाने दणका दिला. वीज कोसळून चौघांचा मृत्यू झाला.
 
दिल्लीतील मिंटो पूल आणि आयटीओसह अनेक ठिकाणी पाण्याची तळी साचली. त्यामुळे मार्गावर व अन्य ठिकणी वाहतूक कोंडी झाली. शहरात तीन तासांत ७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पहाटे पाच वाजल्यापासून मुसळधार पावसास सुरुवात झाली होती. सुमारे २५ झाडे उन्मळून पडली आणि रस्ते जलमय झाल्याने नागरिक अडकून पडले. सुमारे १२ ठिकाणी पाण्याची तळी साचल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. मिंटो मार्गावर जलमय झाला होता. त्यात अनेक वाहने अर्धी पाण्यात तरंगत असल्याच्या चित्रफिती समाज माध्यमावर फिरल्या. तसेच झाडे उन्मळून पडल्याची आणि नागरिक पाण्यात अडकल्याच्या दृश्यांचा त्यात समावेश होता. आर. के पूरम येथील सोमनाथ मार्ग, मिंटो रस्ता आणि खानपूर परिसराला पावसाचा फटका बसला. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले.  महिला आणि तीन मुलांचा मृत्यू जोरदार वार्‍यामुळे झाड अंगावर कोसळून झाला आहे. नसिफगंज भागातील खाकरी नहर गावात घर कोसळले होते, अशी माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी बचाव पथक धावले आणि त्यांनी तेथून चौघांची सुटका केली. त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली. 
 
उत्तर प्रदेशात वीज पडून चौघांचा मृत्यू 
 
उत्तर भारतात दिल्ली एनसीआर, गुरुग्राम, फरिदाबाद आणि मथुरेत जोरदार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी पाण्याची तळी साचल्याने वाहतूक मंदगतीने सुरू होती. उत्तर प्रदेशात पावसाचे चार बळी गेले आहेत.  त्यापैकी तिघांचा वीज पडून मृत्यू झाला. एक घटना इटाह जिल्ह्यातील  भगवंतपूरची असून दुसरी फिरोजाबाद जिल्ह्यातील आहे. दुर्घटनेत काही जण जखमी झाले. 
 

Related Articles