मंदिराची भिंत कोसळून सात भाविकांचा मृत्यू   

आंध्र प्रदेशातील दुर्घटना; पावसामुळे जमीन खचल्याचा दावा

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टण येथील मंदिराची भिंत कोसळून सात भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. 
श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराची भिंत बुधवारी सकाळी कोसळली होती. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दु:ख व्यक्त केले असून जिल्हाधिकारी  आणि पोलिस अधिकारी यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे ते म्हणाले. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी देखील दु:ख व्यक्त केले. गृहमंत्री व्ही. अनिता यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. मुसळधार पावसाने मंदिराजवळची जमीन धसल्यामुळे भिंत कोसळली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.दुर्घटना घडली तेव्हा ३०० रुपयांचे तिकिट असलेल्या रांगेत दर्शन घेण्यासाठी भाविक उभे होते. सिंहगिरी बसस्थानकाजवळ भाविकांची रांग होती. परिसरात मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे जमीन धसून भिंतीचे बांधकाम निखळले. दरम्यान, अनिता यांनी घटनास्थळाचा दौरा केला आणि पाहणी केली. दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाच्या पथकांनी धाव घेतली आणि मदतकार्य राबविले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. ढिगार्‍याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढले. आठ जण ढिगार्‍याखाली अडकले होते. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला असून त्यात तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी घटनेनंतर धक्का बसल्याचे सांगितले. तसेच जखमीवर उपचार करावेत आणि मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली. 
 
दरम्यान, गेल्या वर्षी तिरुमला टेकडीवरील भगवान वेंकटेश्वर स्वामी मंदिराच्या वैकुुंठ द्वार दर्शन तिकीट टोकन गृहाजवळ चेंगराचेंगरीत झाली होती. त्यात सहा भाविकांचा मृत्यू झाला होता.
 

Related Articles