शाळांना उद्यापासून उन्हाळी सुट्टी   

नवीन शैक्षणिक वर्ष १६ जून पासून 

पुणे : राज्यभरातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यात आली आहे. या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
 
राज्यातील महापालिका प्राथमिक शाळा व सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या खाजगी अनुदानित, विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित प्राथमिक शाळांना वार्षिक परीक्षेचा निकाल आज १ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर शाळांना उन्हाळी सुट्टी मिळणार आहे.राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सूटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा लागणार आहे.
 
पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा १६ जून २०२५ रोजी सुरू कराव्या लागणार आहेत.
जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा २३ जून ते २८ जून २०२५ पर्यंत सकाळ सत्रात ७ ते ११.४५ वाजता यावेळेत सुरु कराव्यात व ३० जून पासुन नियमित वेळेत सुरु करण्यात याव्यात, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिकचे प्रभारी शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी जारी केले आहेत.
 
मुख्याध्यापक, लिपिक व इतर शिक्षकेतर कर्मचारी यांना उन्हाळी सुट्टीत इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, आधार व अपार आयडी, स्कुल मॅपिंग, संच मान्यता दुरुस्ती व इतर कामकाज करण्यासाठी कार्यालयात उपस्थित रहावे लागणार असल्याचेही शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles