पानशेत-वरसगाव धरणातील गाळ काढण्याच्या दृष्टीने पाहणी करावी : विखे पाटील   

पुणे : गाळ साचल्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता कमी होेते. त्यामुळे पानशेत व वरसगाव धरणातील गाळाच्या प्रमाणाचे पाहणी करून गाळ काढण्याच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.
 
पानशेत व वरसगाव धरणांच्या पाहणी प्रसंगी त्यांनी अधिकार्‍यांना निर्देश दिले. यावेळी आमदार राहुल कुल, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, जलसंपदा यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश भोसले, पानशेत व वरसगाव प्रकल्पाचे उपअभियंता मोहन भदाणे, पानशेत प्रकल्पाचे शाखाधिकारी अनुराग मारके आदि उपस्थित होते.
 
पानशेत व वरसगाव धरणासाठी संपादित जमिनीचा फेरआढावा घेऊन अतिरिक्त संपादित जमिनीचा अहवाल सादर करावा, अशा सूचना देऊन मंत्री विखे पाटील म्हणाले, पानशेत व वरसगाव येथील महानिर्मिती कंपनीमार्फत कार्यान्वित असलेले जलविद्युत निर्मिती प्रकल्पाबाबत नव्याने अभ्यास करून अतिरिक्त क्षमता वाढविण्यात येईल किंवा कसे याबाबत पाहणी करावी. वरसगाव धरणाची गळती कमी करण्याच्या उपाययोजनेबाबत सविस्तर अंदाजपत्रक करून कार्यवाही करावी. 
 
यावेळी मंत्री विखे पाटील यांनी वीर बाजी पासलकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. वीर बाजी पासलकर यांच्या पुतळ्याचे परिसराचा सुशोभिकरणाचा आराखडा करून त्याचे उत्कृष्ट काम करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.कपोले आणि गुणाले यांनी धरण प्रकल्पांच्या बाबत त्यांचे बांधकामाचे वर्ष, बांधकामाचा प्रकार, साठवण क्षमता, जलविद्युत निर्मिती प्रकल्पांची वीज निर्मिती क्षमता आदिंच्या अनुषंगाने महिती दिली. तसेच पानशेतमधील गाळ काढण्याचे काम नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असल्याचे सांगितले. दोन लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Related Articles