विद्यार्थ्याची गळा चिरून आत्महत्या   

पुणे : वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या वीस वर्षांच्या मुलाने नैराश्यातून सार्वजनिक वानवडी येथे वसतिगृहाच्या स्वच्छतागृहात जाऊन स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. आत्महत्या केलेला विद्यार्थी भोपाळ येथील एम्स (एआयआयएमएस) वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तो मूळचा बीडचा रहिवासी असून, वानवडी येथील सैनिकी वैद्यकीय महाविद्यालयात कार्यक्रम आणि स्पर्धेसाठी आला होता. दरम्यान आत्महत्येपूर्वी त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर चिठ्ठीचे छायाचित्र स्टेटसला ठेवले होते. उत्कर्ष महादेव शिंगणे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. वानवडी येथे आलेला उत्कर्ष हा ८ मेला मित्रांसोबत पुण्यात आला होता. तो सोमवारी पहाटे वसतिगृहाच्या स्वच्छतागृहात गेला. तेथे त्याने व्हाट्स अँप स्टेट्सवर आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी ठेवली आणि आई-वडिलांनादेखील समाजमाध्यमावरून ती चिठ्ठी पाठवली. त्यानंतर, स्वतःचा गळा चिरून जीवन संपवले. उत्कर्षचा शोध घेतला असता कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहाच्या स्वच्छतागृहात त्याचा मृतदेह सापडला. तो कमोडवर बसलेला आढळून आला. शेजारीच रक्त आणि चाकू पडलेला होता. चाकू त्याने ऑनलाईन अँप वरून मागवलेला असल्याची माहिती आता समोर आली आहे. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले असून, याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, उत्कर्षने आत्महत्या का केली? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. 
 
चिठ्ठीत काय?
 
‘मी उत्कर्ष शिंगणे भोपाळमधील ‘एआयआयएमएस’ संस्थेत शिक्षण घेत आहे. अभ्यासाचा ताण, तसेच नैराश्यामुळे मी स्वखुशीने आत्महत्या करत आहे. मी शिक्षण मंत्र्यांना विनंती करत आहे. अभ्यासक्रमात मुघल, फ्रेंच, रशियन इतिहासाचा समावेश करू नये. त्याऐवजी अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राचा समावेश करावा’, असे उत्कर्षने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिले आहे.

Related Articles