ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डॉ. पतंगराव कदम यांच्यामुळे शिक्षणाच्या संधी   

डॉ. तारा भवाळकर यांचे प्रतिपादन; जीवनसाधना पुरस्काराने गौरव

पुणे : भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या, असे गौरवोद्गार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी काढले.भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या वतीने देण्यात येणारा जीवनसाधना गौरव पुरस्कार डॉ. भवाळकर यांना प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. मानपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
भारती विद्यापीठाच्या ३० व्या स्थापना दिन कार्यक्रमात पुरस्कार वितरण झाले.वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा प्रमुख पाहुणे  होते. भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह, प्र-कुलगुरू, आमदार डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, कुलसचिव जी. जयकुमार, आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ. एम. एस. सगरे, डॉ. के. डी. जाधव यावेळी उपस्थित होते. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. मिलिंद जोशी यांचा सत्कार डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
 
डॉ. भवाळकर म्हणाल्या, देशातीलच नव्हे तर परदेशातील विद्यार्थी या विद्यापीठात शिकून संस्थेचे नाव सातासमुद्रापार नेत आहेत. गुणवत्तेच्या जोरावर विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. वयाच्या या टप्प्यावर मिळालेला पुरस्कार प्राणवायुसारखा आहे.हसन मुश्रीफ म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी निर्भिडपणे राजकारण आणि समाजकारण केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या हेतूने त्यांनी आयुष्य वेचले.शिक्षणाचा वारसा जोपासणार्‍या भारती विद्यापीठाने कौशल्य विकासावर आधारित शिक्षणालाही प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा लोढा यांनी व्यक्त केली. 
 
डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही नवनवीन आव्हाने पेलायची आहेत. शिक्षणाचा उपयोग व्यवहारात करता यावा यासाठी कौशल्य विकासावर भर देण्याचा प्रयत्न विद्यापीठाद्वारे केला जात आहे.डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांच्याविषयी प्रेम व जिव्हाळा असल्याने प्रकृती अस्वास्थ्य असतानाही डॉ. तारा भवाळकर यांनी जीवनसाधना गौरव पुरस्कार स्वीकारला याविषयी कृतज्ञ आहे. त्यांचे साहित्य क्षेत्रातील कार्य दिशा देणारे आहे. विद्यापीठाला सलग चौथ्यांदा नॅक ए++ मानांकन मिळाल्याचा आनंद वाटतो.प्रास्ताविक डॉ. विवेक सावजी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र उत्तुरकर, प्रा. डॉ. ज्योती मंडलिक यांनी केले.

Related Articles