त्यांनी डोळ्यादेखत बाबा अन् दोन्ही काकांना संपवले...   

ऋचा मोने हिने सांगितला हृदयद्रावक प्रसंग 

मुंबई : आम्ही पहलगाममधील बैसरण टेकड्यांवर पर्यटनाचा आनंद घेत होतो. सर्वकाही सुरळीत सुरू होते. पर्यटक आनंदाने खेळत, बागडत होेते. अचानक गोळीबार सुरू झाला. पोलिसांच्या वेशातील दहशतवादी हिंदूंना वेचून मारत होते. हिंदू आहे की, मुस्लिम असे विचारत त्यांनी माझ्या संजय काकांना गोळी मारली. हेमंत काका विचारायला आलेे काय झाले, ते बोलत असतानाच  त्यांना गोळी मारली. त्यानंतर माझे बाबा तेथे गेले, ते म्हणाले गोळी नका मारू, आम्ही काही करणार नाही, त्याचवेळी माझ्यासमोर माझ्या बाबांच्या पोटात त्यांनी  गोळी मारली. आमच्या डोळ्यादेखत बाबा आणि दोन्ही काकांना दहशतवाद्यांनी ठार केले. मात्र, आम्ही काहीच करू शकलो नाही, असा हृदयद्रावक प्रसंग अतुल मोने यांची मुलगी ऋचा मोने हिने माध्यमांसमोर सांगितला. त्याचवेळी तिच्या अश्रूंचा बांध फुटला. 
 
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले यांचाही मृत्यू झाला. अतुल मोने यांची मुलगी ऋचा आणि पत्नी अनुष्का यांच्यासमोरच दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. केवळ १५ मिनिटांत मोने, जोशी अन् लेले कुटुंबातील कर्त्या पुरुषांना गोळ्या घातल्या गेल्या. मयत अतुल मोने यांची मुलगी ऋचा मोने म्हणाली, अचानक पहलगाममध्ये गोळीबार सुरू झाला.  काय झाले ते कोणालाच कळत नव्हते. मी दोन जणांना गोळीबार करताना पाहिले. ते विचारत होते, हिंदू कोण? माझे संजय काका, संजय लेले यांनी हात वरती केला. त्या दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या मारल्या. मग माझे दुसरे काका हेमंत जोशी काय झाले हे विचारायला गेले. त्यांनाही त्यांनी गोळी मारली. मग माझे बाबा अतुल मोने ही त्यांना बोलले. गोळ्या मारू नका, आम्ही काही करणार नाही. मात्र बाबांनादेखील माझ्यासमोर गोळी झाडली.  
 
बाबांना गोळी लागली. आम्ही बाबांना उठवायचा प्रयत्न केला. मात्र, बाबा उठत नव्हते. त्यांना उठता येत नव्हते. त्यावेळी तेथील स्थानिक म्हणाले, ज्यांना गोळ्या लागल्या, त्यांना घेण्यासाठी लष्कर येईल. तुम्ही सुरक्षित ठिकाणी जा. त्यामुळे आम्ही तिथून निघालो; पण बाबा आणि काकांना सोडून जावेसे वाटत नव्हते. पण काही कळण्याच्या आतच हे सर्व काही घडले. आईला धीर देत ऋचा हे सगळे सांगत होती. अनुष्का यांचेही अश्रू थांबत नव्हते.दहशतवाद्यांनी महिला, मुले यांना हात लावला नाही. त्यांनी घरातील कर्त्या पुरुषांना मारले. 
 
मोदींचा उल्लेख करत काश्मीरमध्ये आपण दहशत माजवली आहे, असे दहशतवादी पर्यटकांना सुनावत होते. त्यानंतर ते निघून गेले. या हल्ल्यात आम्ही सर्वस्व गमावले आहे. सरकारने दहशतवाद्यांना ठार करावे आणि आम्हाला न्याय द्यावा, असे अनुष्का म्हणाल्या.

राग निष्पाप पर्यटकांवर का?

अनुष्का यांचे भाऊ प्रसाद सोमण म्हणाले, दहशतवाद्यांनी आपला राग निष्पाप पर्यटकांवर का काढला? पर्यटनासाठी धर्म लागतो का? हे क्रूर कृत्य करणार्‍या दहशतवाद्यांना सरकारने पकडले पाहिजे. घरातील कर्ते पुरूष दहशतवाद्यांनी मारले. प्रत्येक घरात मुले शिक्षण घेत आहेत. काही घरात कमवता कोणी नाही. या गोष्टींचा विचार करून सरकारने मृत पर्यटकांच्या मुलांच्या शिक्षणाचा भार उचलावा. त्यांना नोकरीत प्राधान्य मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. 
 

Related Articles