शक्ती परीक्षा नव्हे (अग्रलेख)   

चार राज्यांतील पाच विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल अनपेक्षित मानता येणार नाहीत. प्रमुख पक्षांच्या तेथील स्थितीचा थोडा अंदाज त्यावरून येतो. कोणाचे बळ वाढले किंवा कमी झाले, असेही म्हणता येत नाही.
 
पश्‍चिम आशियातील युद्ध, इराण व इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न अशा घटनांमुळे चार राज्यांत झालेल्या विधानसभांच्या पाच जागांच्या पोटनिवडणुकीकडे कोणाचे फारसे लक्ष जाण्याची शक्यता नव्हती. त्या निवडणुकीला आधीही विशेष प्रसिद्धी मिळली नाही. त्या निवडणुकीचे निकालही धक्‍कादायक किंवा देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारे वगैरे नाहीत. प्रमुख पक्षांना त्या-त्या राज्यातील आपले स्थान काय आहे याचा विचार करण्याची संधी त्यामुळे मिळाली एवढाच त्याचा अर्थ. गुजरातमधील दोन, पंजाब, केरळ व पश्‍चिम बंगाल मधील प्रत्येकी एका जागेसाठी सुमारे आठवड्यापूर्वी ही निवडणूक झाली होती. गुजरात मधील विसावादर मतदारसंघात आम आदमी पक्षाने विजय मिळवून सत्तेतील भारतीय जनता पक्षाला चकित केले. येथे 54.61 टक्के मतदान झाले होते. याच राज्यातील काडी राखीव मतदारसंघात भाजपने विजय मिळवला. पंजाब मधील पश्‍चिम लुधियाना मतदारसंघात ‘आप’ने काँग्रेसचा पराभव केला. दोन्ही राज्यांत 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत या दोन्ही जागा ‘आप’नेच जिंकल्या होत्या. म्हणजे त्यांनी त्या जागा राखल्या, असे म्हणावे लागेल. पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस जिंकणार हे उघड होते. केरळने काँग्रेसला थोडा दिलासा दिला.
 
समीकरणे बदलण्याची शक्यता कमी
 
लोकसभा आणि दिल्‍ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने सपाटून मार खाल्‍ला होता. त्या पार्श्‍वभूमीवर दोन जागा जिंकल्यामुळे या पक्षाचे नैतिक बळ थोडे वाढले असेल. ‘हा विजय म्हणजे 2027 ची उपांत्य फेरी आहे’ असे पक्षाचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल यांनी लगेचच ‘एक्स’पूर्वीचे (ट्वीटर) वर जाहीरही केले. गुजरात व पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होण्यास दोन वर्षे आहेत. त्या आधीच विजयाच्या वल्गना करणे योग्य नाही. ‘इंडिया’ आघाडीत  काँग्रेस व ‘आप’ एकत्र होते; पण लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यात वितुष्ट आले. दिल्लीत ते परस्परांविरुद्ध लढले. आता भाजप व काँग्रेस हे ‘आप’चे प्रतिस्पर्धी बनले आहेत. या दोन्ही पक्षांनी ‘आप’चा पराभव करण्याच्या हेतूने निवडणूक लढवली; पण दोन्ही राज्यांत जनतेने त्यांना नाकारले, असे केजरीवाल म्हणाले आहेत. भाजप व काँग्रेस कोणत्याही निमित्ताने एकत्र येणे शक्य नाही, तरी त्यांनी तसे सूचित केले आहे. काडीची जागा भाजपने मोठ्या फरकाने जिंकली हे केजरीवाल यांनी विचारात घेतले पाहिजे. विसावादरमध्ये काँग्रेसला मिळालेली मते बघता त्या पक्षाची अवस्था तेथे दयनीय आहे, हे स्पष्ट होते. दोन्ही मतदारसंघांत दारूण पराभव झाल्याने गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शक्तीसिंह गोहिल यांनी राजीनामा दिला. त्याने पक्षाला शक्ती कशी मिळेल? राज्यात पक्ष पुन्हा उभारी कसा धरेल याचा विचार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना करणे भाग आहे. पंजाबमध्ये पश्‍चिम लुधियाना मतदारसंघातही ‘आप’च्या उमेदवाराने 11 हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवला. भाजपच्या पुढे हीच काँग्रेससाठी समाधानाची बाब. पश्‍चिम बंगालच्या राजकारणावरील आपली पकड ममता दीदींनी दाखवून दिली. केरळमधील नीलाम्बुरची जागा काँग्रेसने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून हिसकावली. वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत हा मतदारसंघ आहे. वायनाडमध्ये प्रियांका गांधी यांनी विजय मिळवल्याने नीलाम्बुरची जागा काँग्रेसला जिंकणे आवश्यकच होते. त्यांनी सत्तारूढ डाव्यांना धक्‍का दिला ही त्यांच्यासाठी समाधानाची बाब. काँग्रेसचे माजी नेते अर्यादान मुहम्मद यांचा मुलगा शौकत येथे काँग्रेसतर्फे उमेदवार होता. केरळमध्ये डावी आघाडी नऊ वर्षे सत्तेत आहे. आपल्या सरकारबद्दल जनतेत असंतोष नाही, असे मुख्यमंत्री पी. विजयन यांचा दावा आहे. या पोट निवडणुकीच्या निकालांमुळे केरळ, पंजाब किंवा गुजरातमध्ये लगेचच सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता नाही. केरळमध्ये काँग्रेसची स्थिती सुधारत असली, तरी पंजाब व गुजरातमध्ये त्यांना मतदार आकर्षित करण्यासाठी मोठ्या ताकदीनिशी प्रयत्न करावे लागणार आहेत. कोणत्याही पक्षासाठी ही निवडणूक म्हणजे शक्ती परीक्षा नव्हती हा या निकालाचा अर्थ आहे.

Related Articles