शुभांशूंसह ‘अ‍ॅक्सिओम’अवकाशात झेपावले   

 

नवी दिल्ली : अवकाशवीर शुभांशू शुक्ला यांसह अ‍ॅक्सिओम-४’ बुधवारी यशस्वीरीत्या अवकाशात झेपावले. शुभांशू अन्य तीन अवकाशवीरांसह १४ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहणार आहेत. शर्मा हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. या आधी, राकेश शर्मा यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. ४१ वर्षांनंतर ‘अ‍ॅक्सिओम-४’ मोहिमेअंतर्गत शुभांशू यांनी पुन्हा एकदा इतिहास घडविला आहे.
 
‘अ‍ॅक्सिओम-४’ ही व्यावसायिक अवकाश मोहीम अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने आखली असून भारत, पोलंड आणि हंगेरीसाठी ती ऐतिहासिक आहे. या मोहिमेत शुभांशू मिशन पायलट म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्यासोबत अमेरिकेच्या अनुभवी अंतराळवीर मिशन कमांडर पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोस उझनान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू मिशन विशेषज्ञ म्हणून सहभागी आहेत. 
 
या आधी, ३ एप्रिल १९८४ रोजी भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा हे सोव्हिएत संघाच्या मदतीने अवकाश मोहीमेवर गेले होते. ४१ वर्षांनंतर आता शुभांशू अवकाशाच्या दिशेने झेपावले.
 
अमेरिकेतील फ्लोरिडा येथील नासाच्या जॉन. एफ. केनेडी अवकाश केंद्रावरून अवकाश यात्री आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने स्पेस एक्स फाल्कन ९ रॉकेटच्या माध्यमातून भारतीय वेळेनुसार काल दुपारी १२.०१ मिनिटांनी ते झेपावले. शुभांशू यांचे अंतराळयान अवकाशात झेपावल्यानंतर संपूर्ण देशाने आनंद साजरा केला. शुभांशू यांच्या उत्तर प्रदेशातील लखनौच्या सिटी मॉन्टेसरी स्कूलमध्ये या ऐतिहासिक प्रक्षेपणाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केला. शुभांशू अवकाशात झेपावताच कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. 
 
प्रक्षेपणाच्या १० मिनिटांनी अंतराळवीरांनी पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. सुमारे २८ तासांच्या प्रवासानंतर अंतराळवीर आज (गुरुवारी) दुपारी ४.३० वाजता अंतराळ स्थानकात पोहोचतील. पृथ्वीपासून २०० किलोमीटर अंतरावर पोहोचल्यानंतर शुभांशू यांनी देशवासीयांसाठी पहिला संदेश पाठवला.
 
हे अंतराळवीर १४ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहणार आहेत. या काळात ते अनेक महत्त्वपूर्ण ६० वैज्ञानिक प्रयोगांमध्ये भाग घेतील. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रोने) खास शुक्ला यांच्यासाठी तयार केलेले सात प्रयोग ते करणार आहेत. ज्यामध्ये सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणाच्या स्थितीत मेथी आणि मुगाला अंकुरित करण्यासारख्या प्रयोगांचा समावेश आहे. याशिवाय, ते नासाच्या पाच संयुक्त अभ्यासांमध्येही सहभागी होतील.
 
यापूर्वी, २९ मे रोजी अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे पाठवण्यात येणार होते. मात्र, ऐनवेळी रॉकेटमध्ये द्रवरूप ऑक्सिजनमध्ये गळती झाली होती. त्यामुळे मोहीम लांबणीवर पडली होती. त्यानंतर, ८ जून, १० जून आणि ११ जून, २२ जून रोजी मोहीम पुन्हा पुढे ढकलण्यात आली होती. 
 
शुभेच्छांचा वर्षाव...
 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अ‍ॅक्सिओम-४’ मोहिमेच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही याबाबत शुभेच्छा देणारा ठराव मंजूर करण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ठराव वाचून दाखवला. अंतराळवीर शुभांशू शुक्ला १.४ अब्ज भारतीयांच्या इच्छा, आशा आणि आकांक्षा घेऊन जात आहेत. शुभांशू आणि अन्य अंतराळवीरांना यश मिळो, असे या शुभेच्छा संदेश असलेल्या ठरावात म्हटले आहे.
 
जय हिंद! जय भारत! 
 
नमस्कार, माझ्या प्रिय देशवासीयांनो! भारत ४१ वर्षांनी पुन्हा अंतराळात पोहोचत आहे. हा एक अद्भुत प्रवास आहे. आम्ही पृथ्वीभोवती ७.५ किमी प्रति सेकंद वेगाने फिरत आहोत. माझ्या खांद्यावर तिरंगा आहे. मी तुम्हा सर्वांसोबत आहे, हे तो सांगतो. ही केवळ माझ्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रवासाची सुरुवात नाही तर भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाचीही सुरुवात आहे. तुम्ही सर्वांनी या प्रवासाचा भाग व्हावे, अशी माझी इच्छा आहे. तुमची छातीही अभिमानाने फुलली पाहिजे. चला एकत्र मिळून भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात करूया. जय हिंद! जय भारत! अशा शब्दांत शुभांशू यांनी देशवासीयांसाठी संदेश पाठवला आहे.    
 

Related Articles