इराणने इस्रायलवर डागलेला क्लस्टर बॉम्ब काय आहे?   

इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान इराणने प्रथमच क्लस्टर बॉम्बचा वापर केला. हा हल्ला इस्रायलच्या दाट लोकवस्ती असलेल्या गुश दान प्रदेशात झाला. आठ किलोमीटरच्या परिघात जवळपास २० बॉम्ब विखुरले गेले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, नागरी वस्तीत इराणने क्लस्टर बॉम्बचा वापर केल्याने आता जगभरात चिंता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय? ते जाणून घेऊ... 
 
क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय?
 
क्लस्टर बॉम्ब म्हणजे अनेक लहान बॉम्बचा समूह. तो हवेत उघडतो आणि परिसरात लहान-लहान बॉम्बचा वर्षाव करतो. त्यामुळे संपूर्ण परिसरात स्फोट होतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे बॉम्ब एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करून रणगाडे आणि लष्करी शस्त्रे तसेच सैन्य नष्ट करण्यासाठी तयार केले आहेत. तथापि, कधीकधी याचा वापर सामान्य नागरिकांना मारण्यासाठी देखील केला जातो. 
 
कसे काम करतो?
 
हा बॉम्ब विमान, ड्रोन किंवा क्षेपणास्त्रातून डागला जातो. लक्ष्य गाठताच बॉम्ब हवेत उघडतो. त्याच्या आतून शेकडो लहान बॉम्ब बाहेर पडतात. हे बॉम्ब  जमिनीवर पडतात आणि त्यांचा स्फोट होतो किंवा ते काही कालावधीनंतरही फुटतात. 
 
पहिल्यांदा कधी वापरला?
 
रेडक्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीच्या मते, क्लस्टर बॉम्बचा वापर पहिल्यांदा दुसर्‍या महायुद्धात करण्यात आला. शीतयुद्धाच्या काळात क्लस्टर बॉम्बचा मोठा साठा जमा झाला होता. त्यांचा मुख्य उद्देश विस्तृत क्षेत्रात पसरलेले लष्कर आणि शस्त्रसाठा नष्ट करणे हा होता. हे क्लस्टर बॉम्ब त्यांच्या लक्ष्यावर अचूक मारा करत नाहीत. ते लक्ष्यित उद्दिष्टाबाहेरील भागांवर देखील हल्ला करतात. दुसर्‍या महायुद्धानंतर रशिया, अमेरिका, चीन, भारत आदी देशांनी या बॉम्बचा वापर केला.
 
जमिनीपासून सात किलोमीटरवर स्फोट  
 
इस्रायली सैन्याच्या म्हणण्यानुसार, इराणने शुक्रवारी इस्रायलवर डागलेला  क्लस्टर बॉम्ब जमिनीपासून सात किलोमीटर उंचीवर फुटला. यामुळे  इस्रायलच्या आठ किलोमीटरच्या परिघात जवळपास २० छोटे बॉम्ब पडले. सुदैवाने यात कोणताही जीवितहानी झाली नाही. यानंतर, इस्रायली सैन्याने सामान्य नागरिकांना याबाबत सावध केले. कोणत्याही संशयास्पद वस्तूला स्पर्श करू नका, लगेच पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 
 
पारंपरिक क्षेपणास्त्रांपेक्षा वेगळे कसे?
 
क्लस्टर बॉम्बमुळे एखाद्या भागात अनेक ठिकाणी स्फोट होतात. जरी सूक्ष्म अण्वस्त्रे कमी शक्तिशाली असली तरी, या प्रकारच्या क्षेपणास्त्रामुळे इतर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपेक्षा खूप मोठ्या क्षेत्राला धोका निर्माण होतो. यामुळे दाट लोकवस्ती असलेल्या भागात क्लस्टर बॉम्ब धोकादायक बनतात. नागरिकांची घरे किंवा पायाभूत सुविधांना हानी पोहोचवू शकतात.
 
२००८ मध्ये वापराविरूद्ध करार
 
२००८ मध्ये क्लस्टर बॉम्बच्या वापराविरुद्ध एक करार करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय करारानुसार क्लस्टर बॉम्बचा वापर, साठा, हस्तांतरण आणि उत्पादन यावर बंदी आहे. एकूण १११ देशांनी आणि १२ इतर संस्थांनी यावर स्वाक्षरी केली आहे; परंतु इराण, इस्रायल, रशिया आणि अमेरिका यासारख्या प्रमुख लष्करी शक्तींनी या करारात सामील होण्यास नकार दिला. मार्चच्या सुरुवातीला रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडील डोब्रोपिलिया प्रदेशावर क्लस्टर बॉम्बने हल्ला केला. ज्यामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागाला लक्ष्य करण्यात आले आणि ११ नागरिक ठार झाले होते. 
 
भारत ते वापरतो का?
 
क्लस्टर बॉम्बच्या वापरावर बंदी घालण्याच्या करारावर स्वाक्षरी न केलेल्या देशांपैकी भारत एक आहे. राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत भारताने या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. क्लस्टर बॉम्बच्या वापराबाबत भारताकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. तथापि, गरज पडल्यास भारत त्याचाही वापर करू शकतो. 
 
इराण आणि इस्रायलकडेही साठा 
 
इराण आणि इस्रायलकडेही क्लस्टर बॉम्ब आहेत. या दोन्ही देशांनी २००८ च्या क्लस्टर बॉम्बच्या निर्मिती, साठवणूक, हस्तांतरण आणि वापरावरील आंतरराष्ट्रीय बंदीमध्ये सामील होण्यास नकार दिला आहे.  
 
क्लस्टर बॉम्बचा वापर युद्ध गुन्हा आहे का?
 
क्लस्टर बॉम्बचा वापर आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन ठरत नाही; परंतु नागरिकांविरुद्ध त्यांचा वापर केल्याने ते कायद्यांचे उल्लंघन होऊ शकते. युद्ध गुन्हा निश्चित करण्यासाठी बॉम्बचे लक्ष्य काय होत,े हे पाहणे आवश्यक असते. 
 
क्लस्टर बॉम्बवर बंदी का? 
 
क्लस्टर बॉम्बमधून टाकलेले बरेच बॉम्ब हल्ल्याच्या वेळी फुटत नाहीत; परंतु नंतर जेव्हा नागरिक किंवा बचाव पथके त्यांच्या संपर्कात येतात; तेव्हा त्यांचा स्फोट होतो. युद्धात सहभागी नसलेल्या किंवा युद्धात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी गेलेल्या सामान्य नागरिकांचा यात नाहक बळी जाऊ शकतो. त्यामुळे क्लस्टर बॉम्बच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

Related Articles