महिलेचा अपमान करणे अयोग्य   

डॉ. मेधा कुलकर्णी यांनी खडसावले

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मी मागणी केल्यानंतर त्यावरून सुरू असलेले राजकारण घाणेरडे आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मी मागणी केली आहे. लोकशाहीत बोलण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यांनीही वेगळ्या नावाची मागणी करावी, जो निर्णय घ्यायचा तो संबंधीत यंत्रणा घेईल. मात्र, यावरून एका महिलेला बदनाम करणे, तिचा अपमान करणे योग्य नाही. त्यामुळे ज्यांनी बदनामीकारण फलक लावले आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी केली. ज्यांनी माझ्या सोबत काम केले आहे, त्यांची नावे त्या फलकावर होती, याचे वाईट वाटते असे म्हणत त्या भावुक झाल्या.
 
खासदार कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या मोठ्या प्रमाणात टीका झाली. तसेच अनेकांनी रेल्वे स्थानकाला नाव देण्यासाठी विविध नावे सुचवली. तर दुसरीकडे कोथरूड सह शहरात अनेक ठिकाणी बुधवार पेठेला मस्तानीचे नाव देण्याची मागणी करा, असे फलक झळकले. या फलकवरून राज्य महिला आयोगाने संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी पुणे पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे.
 
या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना खासदार कुलकर्णी म्हणाल्या, रेल्वे स्थानकाच्या नावावरून सुरू असलेले राजकारण अतिशय घाणेरडे आहे. स्थानकाला नाव देण्यासाठी कोणीही वेगवेगळी नावे सुचवू शकतात. लोकशाही आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मी थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव सुचविले. त्यांचे नाव भूषणवाह असून, त्यांनी मराठी साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर आक्षेपार्ह फलक शहरात लावले गेले. हे खालच्या दर्जाचे राजकारण आहे. हा प्रकार निंदनीय आहे. मस्तानी या बाजीराव पेशवे यांच्या पत्नी होत्या. त्या एक योद्धा देखील होत्या. असे फलक लावून त्यांची हेटाळणी करण्यात आली. त्यांनी देशात पहिला आंतरधर्मीय विवाह केला. 
 
महिलांविषयी बोलताना भान ठेवणे गरजेचे आहे. या फलकामुळे मला खूप वाईट वाटले. जे नवीन आहेत, त्यांच्याबद्दल मला काही बोलायचे नाही. मात्र, ज्यांनी माझ्यासोबत काम केले आहे, त्यांची नावे त्या फलकावर होती. त्यामुळे मला वाईट वाटले, काळ सोकावता कामा नये, त्यामुळे फलक लावणार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी खासदार कुलकर्णी यांनी केली. 

Related Articles