गांजाची शेती करणार्‍या दोघांना अटक   

दोन कारवायांमध्ये १६ लाख १३ हजारांचा गांजा जप्त 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनने आळंदी आणि महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दोन कारवाया केल्या. गांजाची शेती करणार्‍या दोघांना अटक करून त्यांच्याकडून १६ लाख १३ हजार किमतीची ५५ गांजाची झाडे जप्त केली आहेत. 
 
पहिली कारवाई आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मरकळ गावातील बागवान वस्ती येथे करण्यात आली. गंगे माने कामी (वय ५८, रा. बागवान वस्ती, मरकळ, खेड. मूळ रा. नेपाळ) याला अटक करण्यात आली आहे. त्याने शेतामध्ये गांजाची झाडे लावली होती. गुन्हे शाखेने कारवाई करत दोन लाख १३ हजार किमतीची गांजाची १५ झाडे जप्त केली. त्याचे वजन ४.२६० किलो आहे. गंगे माने कामी हा बागवान वस्ती येथील एका शेतामध्ये काम करत होता. शेतकर्‍याच्या परस्पर त्याने शेतामध्ये गांजाची झाडे लावली होती.
 
दुसरी कारवाई महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरेगाव खुर्द येथे करण्यात आली. या कारवाईमध्ये बाळू बबन गाळव (वय ६५, रा. कोरेगाव खुर्द, खेड) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने त्याच्या शेतामध्ये गांजाची ४० झाडे लावली. पोलिसांनी कारवाई करत २८ किलो वजन असलेली १४ लाख किमतीची झाडे जप्त केली. आरोपीकडे १२५० रुपयांचा २५ ग्रॅम तयार गांजा देखील आढळून आला. पोलिसांनी एकूण १४ लाख १ हजार २५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

Related Articles