सासूचा खून करणार्‍या सुनेला जन्मठेप   

तळेगाव दाभाडे (वार्ताहर) : कौटुंबिक वादातून सासूचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात टाकून टेरेसवर ठेवला. सडलेला मृतदेह पतीच्या मदतीने नाल्यात फेकून दिला. ही घटना तळेगाव दाभाडे येथे २०२१ मध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी सून आणि मुलाला अटक केली होती. यातील आरोपी सुनेला जन्मठेप, तर मृत महिलेच्या मुलाला १८ महिने कारावास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. वडगाव मावळ सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी हे आदेश दिले.
 
पूजा मिलिंद शिंदे असे जन्मठेप शिक्षा झालेल्या सुनेचे नाव आहे. पूजा हिने वादाचा राग मनात धरून सासूचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह दोन दिवस टेरेसवर पोत्यामध्ये बांधून ठेवला. दिराने, आई कुठे आहे असे विचारले असता,ती माझ्यासोबत वाद करून घरातून निघून गेली, असे पूजाने सांगितले. दरम्यान, शेजान्यांनी तुमच्या टेरेसवरील पोत्यातून घाण वास येत असून ते फेकून द्या, असे सांगितले. पूजा हिने ते पोते नाल्यामध्ये नेऊन टाकले. यासाठी तिचा पती मिलिंद याच्याकडून तिला मदत झाली.
 
सरकारतर्फे खटल्यामध्ये विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून स्मिता मुकुंद चौगुले यांची नियुक्ती होती. चौगुले यांनी न्यायालयात वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे याच्यासह साक्षीदार उभे करून युक्तिवाद केला. त्याकरिता त्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करत बाजू मांडली. देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावार, तत्कालीन तपासी अधिकारी नारायण पाटील, कोर्ट पोलीस अंमलदार अविनाश गोरे यांनी न्यायालयात पाठपुरावा केला.

Related Articles