भारताच्या 21 कंपन्या ‘दुर्मिळ पृथ्वी चुंबक’ खरेदीस इच्छुक   

वृत्तवेध 

अनेक भारतीय कंपन्या चीनमधून ‘दुर्मिळ पृथ्वी चुंबक (रेअर अर्थ मॅग्नेट्स)’ खरेदी करू इच्छितात. त्यासाठी त्यांना चीनच्या वाणिज्य मंत्रालयाकडून परवाना घ्यावा लागतो. आता ही संख्या 21 पर्यंत वाढली आहे. यापूर्वी 11 कंपन्या परवान्याच्या प्रतीक्षेत होत्या.
 
या कंपन्यांमध्ये बॉश इंडिया, मरेली पॉवरट्रेन इंडिया, माले इलेक्ट्रिक ड्राइव्हस इंडिया, टीव्हीएस मोटर आणि युनो मिंडासारख्या मोठ्या कंपन्याचा समावेश आहे. या कंपन्या त्यांच्या उत्पादनांमध्ये ‘रेअर अर्थ मॅग्नेट्स’ वापरतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपन्या इलेक्ट्रिक वाहने, ऑटोमोबाईल्स आणि इतर मशीनमध्ये वापरल्या जाणार्‍या अत्याधुनिक उपकरणांसाठी ‘रेअर अर्थ मॅग्नेट्स’ वापरतात.
 
एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या मते, कंपन्यांनी चीनमधील त्यांच्या पुरवठादारांना आवश्यक कागदपत्रे पाठवली आहेत; परंतु त्यांना अद्याप परवाना मिळालेला नाही. जुलैच्या सुरुवातीपर्यंत परवानगी न मिळाल्यास या कंपन्यांचा साठा संपून उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. 4 एप्रिल 2024 रोजी चीनने एक नवीन नियम लागू केला. त्यानुसार चिनी कंपन्यांनी मध्यम आणि जड स्वरूपाची रेअर अर्थ मॅग्नेट्स निर्यात करण्यापूर्वी वाणिज्य मंत्रालयाकडून परवाना घेणे बंधनकारक केले. याशिवाय आयात करणार्‍या कंपन्यांनाही एक प्रमाणपत्र द्यावे लागते. ते हमी देते की ही अर्थ मॅग्नेट्स शस्त्रे किंवा विध्वंसक तंत्रज्ञानात वापरली जाणार नाहीत. भारत सरकार याबाबत चीनशी चर्चा करत आहे. या चर्चेतून कंपन्यांना लवकरात लवकर परवाने मिळू शकतील, अशी अपेक्षा होती; परंतु अद्याप कोणताही ठोस उपाय सापडलेला नाही. त्याच वेळी चीनने काही युरोपीयन कंपन्यांना रेअर अर्थ मॅग्नेट्स पुरवण्याची परवानगी दिली आहे. अर्थात त्यांच्या भारतातील शाखांना अद्याप परवानगी मिळालेली नाही. ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’ (सियाम) नुसार, भारतातील 52 कंपन्या चीनमधून ‘रेअर अर्थ मॅग्नेट्स’ आयात करतात. 2024-25 या आर्थिक वर्षात भारताने 870 टन ‘रेअर अर्थ मॅग्नेट्स’च्या आयातीवर सुमारे 306 कोटी रुपये खर्च केले आहेत.

Related Articles