भरतनाट्यमधून साकारले गीतरामायण   

पुणे : गीत-संगीतासह भरतनाट्यम् नृत्याद्वारे साकारलेले रामायणातील विविध रोमांचकारी प्रसंग रसिकांना खिळवून ठेवणारे ठरले. निमित्त होते स्वरांगण आणि कलांगण अकादमीतर्फे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने आयोजित ‘गीत हा कार्यक्रम पार पडला. 
 
गायन-वादन, नृत्याविष्कार आणि प्रभावी निवेदनाच्या माध्यमातून, भाषाप्रभू ग. दि. माडगूळकर रचित आणि स्वरगंधर्व सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले ‘गीतरामायण’ या लोकप्रिय रामकथेच्या दीव्यपद्यांचे सादरीकरण करण्यात आले. ग. दि. माडगूळकर यांचे सुपुत्र आनंद माडगुळकर तसेच डॉ. अतुल जोशी, प्रसिद्ध सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी, यशवंतराव कुलकर्णी, उदय कुलकर्णी आणि संजय गोसावी आदी उपस्थित होते.
 
दशरथ राजाचा परिवार, श्रीराम आणि त्यांच्या बांधवांचा जन्मसोहळा, सीतास्वयंवर, श्रीरामांचे वनवासगमन, सीताहरण, सीतेचा शोध घेण्यासाठी श्रीरामांनी वानरसेनेसह केलेले अथक प्रयत्न, रामसेतूची उभारणी, राम-रावण युद्ध आणि अखेर रावण वध अशा रामायणातील अनेक प्रसंग कलाकारांनी अवघ्या अडीच तासात सादर करून रसिकांसमोर संपूर्ण रामकथा चितारली. यावेळी ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला’, ‘दशरथा हे घे पायसदान’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘नकोस नौके परत फिरू’, ‘पराधीन आहे जगती’ यांसारख्या अजरामर गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. 
 
कार्यक्रमात एकूण १८ युवा कलाकारांचा सहभाग होता. १० कलाकारांनी नाट्य आणि नृत्याविष्कार सादर केला. कार्यक्रमाची संकल्पना आणि नृत्य दिग्दर्शन तेजस माने यांनी केले होते. चंद्रकांत शिंदे, संतोष वाघ, मिताली लोहार यांनी गीते सादर केली. राजेंद्र आफळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आयोजन उदय कुलकर्णी, संजय गोसावी, हृषीकेश सबनीस, रमा सबनीस, अश्विन आपटे, रवी नल्ले यांनी केले होते.

Related Articles