आगामी मालिका अटीतटीची   

बदलते क्रीडाविश्व, शैलेंद्र रिसबूड

नवा कर्णधार आणि नवा चेहरा अशी ओळख घेऊन इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय क्रिकेट संघाबाबत कमालीचे कुतूहल निर्माण झाले आहे. मालिकेबाबत वेगवेगळी भाकितेदेखील वर्तवली जाऊ लागली आहेत. इंग्लंड-भारत यांच्या दरम्यानची मालिका ऐन तोंडावर आलेली असताना ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन आणि दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन यांनी मालिकेतील वर्चस्वाबाबत मात्र परस्पर विरोधी मते व्यक्त केली आहेत.
 
भारताने सुरुवातीच्या लीड्स आणि मँचेस्टर येथील कसोटी सामने जिंकले, तर भारत ही मालिका जिंकण्याची दाट शक्यता असल्याचे मत मॅथ्यू हेडन यांनी व्यक्त केले आहे. त्याच वेळी डेल स्टेनने मात्र इंग्लंड 3-2 अशी मालिका जिंकणार असे भाकित वर्तवले आहे. इंग्लंड संघात चांगले गोलंदाज नाहीत. जे आहेत त्यांना दुखापतींची चिंता आहे. प्रमुख गोलंदाज निवृत्त झाले आहेत. त्यामुळे इंग्लंड संघाला मुळात अंतर्गत आव्हानाला तोंड द्यावे लागेल असे हेडन म्हणाले. इंग्लंडमध्ये उत्तरेकडील भागात होणारे सामने निर्णायक ठरतात. ते सामने भारताने जिंकले, तर मालिका भारताच्या बाजूने जाऊ शकेल असे हेडन यांनी सांगितले. भारतीय संघाच्या अखेरच्या कसोटी सामन्याच्या दौर्‍यानंतर जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे प्रमुख गोलंदाज निवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांची गोलंदाजी क्षमता कमी झाली आहे. 
 
’भारतीय संघदेखील रोहित शर्मा, विराट कोहली, आर. अश्‍विन यांच्या निवृत्तीनंतर नव्या युगाची सुरुवात करत आहे. तरुण फलंदाजांकडे गुणवत्ता असली, तरी अलीकडच्या काळात कसोटी सामन्यांच्या मर्यादित संख्येमुळे भारतीय संघालादेखील आव्हानाचा सामना करावा लागेल’ असे हेडन म्हणाले. दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज डेल स्टेन याने इंग्लंडला विजयाची अधिक संधी दिली असली, तरी भारतीय संघालाही निराश केले नाही. भारतीय संघ तरुण आहे. इंग्लंड जिंकणार असे मी म्हटले असले, तरी भारतीय संघ त्यांना झुंजवेल आणि एक, दोन सामने जिंकेल, असे स्टेनने सांगितले. 
 
या मालिकेतील वर्चस्वाविषयी हेडन आणि स्टेनच्या बरोबरीने भारताच्या दीप दासगुप्ता आणि संजय मांजरेकर यांनीदेखील मालिका जिंकण्याची इंग्लंडला अधिक संधी असल्याचे म्हटले आहे. भारताचा संघ तरुण आहे. कर्णधारदेखील नवा आहे. मुख्य म्हणजे प्रमुख खेळाडूंच्या निवृत्तीनंतर भारतीय संघ संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. याचा इंग्लंडला फायदा मिळेल. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा उठवून ते मालिका 3-2 अशी जिंकतील असे दीप दासगुप्ता म्हणाला. 

Related Articles