इस्रायलच्या तीन हेरांना इराणमध्ये फाशी   

तेहरान : इस्रायलच्या तीन गुप्तहेरांना इराणने बुधवारी फाशी दिली. इस्रायलसासाठी ते हेरगिरी करत असल्याने त्यांना फासावर लटकविल्याचे वृत्त आयआरएनए वृत्तसंस्थेने दिले. 
आझाद शोजाई, इद्रिस अली आणि इराकी नागरिक रसूल अहमद रसूल, अशी हेरांची नावे आहेत. त्यांना फाशी देऊ नये, अशी मागणी आंतरराष्ट्रीय पातळीवरुन केली होती; परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना अखेर फासावर लटकविले गेले. इराण आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हेरांना फाशी दिल्याचे मानले जात आहे. पश्चिम अझरबैजान प्रांतातील उरमिया तुरुंगात त्यांना फाशी दिल्याचे सांगितले. तिघेही हत्या करण्याच्या उद्देशाने इराणमध्ये शिरले होते, असा आरोप त्यांच्यावर ठेवला होता. इस्रायलविरोधात संघर्ष सुरू असताना यापूर्वी अनेक जणांना हेरगिरीच्या आरोपाखाली फासावर चढविण्यात आले होते. त्यानंंतर काल आणखी तिघांना फासावर चढविले. त्यामुळे १६ जून पासून कालपर्यंत एकूण सहा जणांना फाशी दिली आहे. आणखी काही जणांना तशीच शिक्षा दिली जाईल, अशी भीती सामाजिक कार्यकर्त्यानी व्यक्त केली. दरम्यान, हेरगिरी करणार्‍या व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी रविवारपर्यंत मुदतही दिली. 
 

Related Articles