निकाल पाहणार्‍या युवकाला मारहाण   

पुणे : शहरातील नामांकित महाविद्यलयात निकाल पाहण्यावरून झालेल्या वादातून 10 ते 15 विद्यार्थ्यांच्या टोळक्याने एका विद्यार्थ्याच्या डोक्यात वासा घालून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या मारहाणीत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत.
 
इरफान मोहम्मद हुसेन करणूल (वय 31, युनिटी पार्क, मलिकनगर, कोंढवा) यांनी याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महाविद्यालयाच्या आवारात झालेली ही घटना सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादामुळे या घटनेला हिंसक स्वरूप मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
 
तक्रारदार यांचा भाचा हा त्याच्या मित्राच्या नावाची महाविद्यालयाच्या यादीमध्ये नोंद आहे का?, हे पाहण्यासाठी महाविद्यालयात गेला होता. यादी पाहत असताना दुसर्‍या विद्यार्थ्याचा धक्का लागल्यामुळे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर हाणामारीतून हे प्रकरण अधिक बिघडले.महाविद्यालयाच्या आवारात आल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर संबंधित आरोपी विद्यार्थ्याने 10 ते 15 साथीदारांना बोलावून तक्रारदार यांच्या भाच्यावर अचानक हल्ला केला. 
 
या हल्ल्यात एका आरोपीने रस्त्यावर पडलेला वासा उचलून सात ते आठ वेळा तक्रारदार यांच्या भाच्याच्या डोक्यावर मारला. त्यामुळे त्याच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव होऊन तो बेशुद्ध पडला. त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीने तत्काळ हस्तक्षेप करून वासा काढून घेतल्यामुळे त्याचा जीव वाचला. त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या विद्यार्थ्याने आपल्या मामाला फोन करून सर्व प्रकार सांगितला. मामाने तत्काळ महाविद्यालयात धाव घेतली आणि आपल्या भाच्याला रुग्णालयात दाखल केले. 
 
पीडित विद्यार्थी हे केईएम रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. लष्कर पोलीस ठाण्यात संबंधित विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांच्या अटकेसाठी पथक स्थापन केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Articles