शिक्षणातूनच चांगला नागरिक घडण्याचे संस्कार : गडकरी   

पुणे : सामाजिक संवेदनशीलता, सामाजिक दायित्व, राष्ट्रप्रेम हे विकत मिळत नाही, तर ते शिक्षणातून येते. भविष्यातील उत्तम समाजासाठी चांगला नागरिक घडविण्याचे संस्कार शिक्षणातूनच होतात,असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या (पीईएस) आनंदोत्सव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी सोसायटी संचलित महाविद्यालये आणि शाळांच्या विविध पातळ्यांवरील यशानिमित्त प्राचार्य, मुख्याध्यापक आणि पदाधिकार्‍यांचा सत्कार गडकरी यांच्या हस्ते झाला.
 
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह शामकांत देशमुख, सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह डॉ. निवेदिता एकबोटे आदी यावेळी उपस्थित होते.
 
गडकरी म्हणाले,  काळाच्या ओघात आर्थिक विकासाला प्राधान्य मिळत आहे. परंतु भविष्यातील चांगल्या समाजासाठी सुजाण नागरिक घडविण्यात शिक्षण महत्त्वाचे असते. ज्ञान आणि चांगला माणूस असणे, सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणे यात फरक आहे. आयुष्यात सिद्धांत, नीतिमत्ता, मूल्य, गुणवत्ता महत्त्वाची असते. ते म्हणाले, सहकारी किंवा शैक्षणिक संस्थेचे नेतृत्व चांगले असले तर कितीही वादळे, आली तरी संस्था योग्य दिशेने जाते. नेतृत्वाचा संबंध सिद्धांत आणि मूल्याशी असला पाहिजे. शिक्षण क्षेत्रात विस्तारीकरण करताना शिक्षणाचा आत्मा, भावार्थ गमावता कामा नये. शिक्षण क्षेत्रात मूल्ये महत्त्वाची आहेत.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यातील ४०० महाविद्यालये स्वायत्त असून येत्या काळात ही संख्या पाचशेपर्यंत नेण्याचा मानस आहे. महाविद्यालयांना स्वायत्तता दिल्यानंतर त्यांना नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचे स्वातंत्र्य मिळत आहे. प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रातील उच्च शिक्षण घेणार्‍या पाच लाख विद्यार्थिनींना ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत दर महिना दोन हजार रुपये मिळावेत म्हणून प्रयत्न सुरू आहेत. यावेळी डॉ. गजानन एकबोटे यांनी मनोगत व्यक्त केले. ज्योत्स्ना एकबोटे प्रास्ताविक, तर डॉ. निवेदिता एकबोटे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles