युद्धबंदीच्या घोषणनेनंतरही हल्ले सुरुच   

दुबई : इराण-इस्रायलमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.  मात्र, ट्रम्प यांनी घोषणा केल्यानंतरही इराण आणि इस्रायलने मंगळवारी एकमेकांवर हल्ले सुरुच ठेवले. यामुळे ट्रम्प यांची मध्यस्थी अपयशी ठरली किंवा कसे? अशी चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प प्रशासनातील अधिकारीदेखील या संदर्भात आश्चर्य व्यक्त करत होते. इराण आणि विशेषतः इस्रायलवर ट्रम्प प्रचंड संतापले आहेत. 
 
इस्रायल आता इराणवर हल्ला करणार नाही, असे सांगून ट्रम्प म्हणाले की, सर्व इस्रायली विमानांना माघारी बोलवा, असे मी सांगितले आहे. तसेच, इराण देखील कधीही आपला अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार नाही. युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर लगेच इस्रायलने इराणवर एवढा मोठा बॉम्ब टाकला की, मी आजवर पाहिलाच नाही! दोन्ही देशांनी युद्धविरामास पूर्णपणे सहमती दर्शवली. पण, त्यांनी पहिल्याच तासात बॉम्ब टाकले. त्यामुळे मी इस्रायलवर नाराज आहे, इराणवर देखील खुश नाही.आता बॉम्ब टाकू नका, जर तुम्ही असे केले तर ते युद्धबंदीचे उल्लंघन ठरेल, असे ट्रम्प यांनी इस्रायलला उद्देशून सांगितले.

अटींनंतरच अंतिम निर्णय

ट्रम्प यांच्या घोषणेनंतरही इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. यामध्ये नऊ जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. या कारवाईचे समर्थन करताना इराणने म्हटले आहे की, इस्रायलने कोणत्याही युद्धबंदीला ताबडतोब मान्यता दिली नाही आणि मंगळवारी पहाटे तेहरान आणि इतर शहरांमध्ये जोरदार हल्ले सुरुच राहिले. सध्या, युद्धबंदी किंवा लष्करी कारवाया थांबवण्याबाबत कोणताही करार झालेला नाही, असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी तेहरानच्या प्रमाणवेळेनुसार, पहाटे ४:१६ वाजता समाज माध्यमावर पोस्ट केली होती. ट्रम्प प्रशासनाने युद्धबंदीबाबत नेमक्या काय अटी घातल्या आहेत, हे जाणून घेतल्यानंतर लष्करी कारवाया थांबवण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. ट्रम्प यांच्या विधानावर इस्रायली लष्कराने भाष्य करण्यास नकार दिला. पण, ट्रम्प यांनी सांगितल्याप्रमाणे युद्धबंदी झाली तर ती जगासाठी आनंदाची बातमी असेल; परंतु, मध्य पूर्वेतील परिस्थिती अजूनही स्थिर नाही, असेही इस्रायली लष्कराने म्हटले आहे. 

... तर चोख प्रत्युत्तर 

इराणने युद्धबंदीचे उल्लंघन केले तर त्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी दिला. इराणचा अणु आणि बॅलिस्टिक धोका संपविण्याचा मुख्य उद्दिष्ट यशस्वीरीत्या साध्य झाला आहे. इस्रायलन ‘रायझिंग लायन’ची सर्व उद्दिष्टे साध्य केली. त्यामुळे युद्धबंदीवर सहमती दर्शविण्यास आधार मिळाला असल्याचे नेत्यानाहू यांनी निवेदनात म्हटले आहे.संरक्षण मंत्री, सर सेनाध्यक्ष यांच्यासोबत आपत्कालीन बैठक घेतली. याबैठकीत हा निष्कर्ष काढण्यात आला, असे ते म्हणाले. या कारवाईत सहकार्य केल्याबद्दल अमेरिका आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे देखील आभार मानण्यात आले. इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील समन्वयानंतर युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला असल्याचे नेत्यानाहू यांनी म्हटले आहे.

युद्धबंदीचे पालन करा...

इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली आहे, असे ट्रम्प यांनी पहाटे साडेतीन वाजता समाज माध्यमावरील पोस्टमध्ये सांगितले. युद्धविराम २४ तासांत टप्प्या-टप्प्यात होईल. त्याची सुरुवात इराणपासून होईल. सुरुवातीच्या १२ तासांत इराण कोणत्याही प्रकारचा हल्ला करणार नाही. त्याचप्रमाणे, इस्रायलदेखील पुढील १२ तास कोणत्याही प्रकारचा हल्ला करणार नाही. अशारितीने २४ तासांत पूर्ण युद्धबंदी होईल, असे ट्रम्प यांनी म्हटले. हे असे युद्ध आहे की, जे वर्षानुवर्षे चालू राहिलेे असते आणि संपूर्ण मध्य पूर्व नष्ट झाले असते. परंतु, ते झाले नाही आणि कधीही होणार नाही, असेही ट्रम्प यांनी म्हणाले. ट्रम्प यांच्या घोषणेनंतरही इराणने हल्ला केला. त्यावर, युद्धबंदीचे पालन करा, असा इशारा ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दिला.
 

Related Articles