पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलू नका   

खासदारांची बैठकीत मागणी 

पुणे : जीएमआरटी प्रकल्पाचे कारण सांगत, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलला जात आहे. बदलल्या मार्गामुळे प्रवाशांचा प्रवास लांबणार आहे. त्यामुळे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प पुणे-चाकण-संगमनेर-सिन्नर-नाशिकअसा पूर्वीच्याच सरळ मार्गानेच व्हावा, अशी मागणी रेल्वेच्या पुणे मुख्यालयात झालेल्या बैठकीत खासदारांनी उपस्थित केली.
 
पुणे व सोलापूर विभाग रेल्वे समितीची बैठक विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, पुणे येथे पार पडली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, ओमप्रकाश निंबाळकर, धैर्यशील मोहिते-पाटील, डॉ. अमोल कोल्हे, भाऊसाहेब वाकचौरे, निलेश लंके, विशाल पाटील, रजनी पाटील, नितीन जाधव-पाटील, शिवाजी बंडप्पा काळगे, माया नारोलिया आणि मेधा कुलकर्णी यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना, उपमहाव्यवस्थापक के. के. मिश्रा, पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा व सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुजीत मिश्रा उपस्थित होते.
 
भारतातल्या जीएमआरटी प्रमाणेच जर्मनी, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका अशा देशांमध्येही भव्य टेलिस्कोप अस्तित्वात आहेत. योग्य नियोजन व योग्य अंमलबजावणी या आधारावर त्या देशांनी टेलिस्कोपच्या परिसरातून रेल्वे प्रकल्प यशस्वीरीत्या सुरू केले आहेत. म्हणूनच, जीएमआरटी प्रकल्प हे रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्याचे कारण असू शकत नाही. रेल्वे विभागाने परदेशातील या तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा व पूर्वी ठरलेल्या मार्गानेच पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी या बैठकीत मांडली. यावेळी सर्वानुमते खासदार सुप्रिया सुळे यांची या समितीच्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.
 
बैठकीत उपस्थित मुद्दे 
 
सासवड रस्ता रेल्वे स्थानकाचे नाव काळे- बोराटेनगर असे करावे.
पुणे-दौंड या रेल्वे मार्गाला उपनगरीय रेल्वे मार्गाचा दर्जा द्यावा. 
आळंदी रेल्वे स्थानक येथे कोचिंग टर्मिनल स्थानक उभारण्यात यावे.
ससाणे नगर आणि काळेपडळ या रेल्वे गेटवर अंडरपास बांधणे आणि कोरेगाव मूळ येथे उड्डाणपूल बांधणे. 
हडपसर टर्मिनल आणि सासवड रस्ता रेल्वे स्थानकावर पायाभूत सुविधांची उभारणी करावी.
पनवेल-कर्जत, उरण-घाटकोपर या मार्गांच्या धरतीवर पुणे-दौंड सेमीअर्बन कॉरिडॉर करावा.
महाराष्ट्रातील औद्योगिक वाहतुकीला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर-खर्डे एमआयडीसी-रांजणगाव चाकण-तळेगाव-जेएनपीटी अशा विशेष औद्योगिक रेल्वे मार्गाबाबत चाचपणी करावी.
लोणी काळभोर व कुंजीरवाडी येथे रेल्वे प्रशासन व शेतकर्‍यांमध्ये जागेबद्दल सुरू असलेल्या संघर्ष मिटवण्यासाठी जमिनीची संयुक्त मोजणी करावी.

Related Articles