मदतवाटप केंद्र परिसरातील गोळीबारात २५ पॅलेस्टिनी ठार   

डेर अल बलाह : गाझा पट्टीत मध्यवर्ती भागात मदत साहित्यांच्या वाटपावेळी इस्रायली सैनिकांनी  मंगळवारी सकाळी गोळीबार केला. त्यात २५ नागरिक ठार झाले.नेटरझारीम संरक्षित जागेत नागरिकांचा एक गट आला होता. ते मदत साहित्यासाठी आले होते. तेव्हा सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. जखमींना तातडीने नुसरत येथील आश्रयस्थानातील रुग्णालयात दाखल केले. त्यांनी सांगितले की, आम्ही वाडी गाझा येथील सालेह अल डीन मार्गावर एका मालमोटारीची वाट पाहात होतो. तेव्हा सैनिकांनी आमच्यावर गोळ्या झाडल्या. मालमोटारीतून साहित्य येत असताना काही त्या दिशेने धावले होते. परिसरात ड्रोनही घिरट्या घालत होते. त्यामधून आणि रणगाड्यातून आमच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. आरडाओरड आणि रक्त वाहिले. त्या गोळीबारात तीन जण ठार तर काही जखमी झाले. 
 
उर्वरित पळून गेले. आवादा रुग्णालयाने सांगितले की, १४६ जखमी नागरिक उपचारासाठी दाखल झाले. त्यापैकी ४६ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना मध्य गाझातील रुग्णालयात हलवले आहे.  डेअर अल बलाह येथील अल अक्सा रुग्णालयात सहा मृतदेह आणले होते. 

गोळीबार का होतो? 

अन्न आणि मदत साहित्यासाठी नागरिकांचे लोंढे केंद्रावर येतात. तेव्हा अनेकदा गोंधळ उडतो. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी सैनिक गोळ्या झाडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. काही संशयित गर्दीचा फायदा उठवून सैनिकांच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याचे दिसताच सैनिक सुरक्षेसाठी गोळ्या झाडत असल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण विभागाने केला. दरम्यान, इस्रायल आणि हमास दहशतवादी संघर्षात आतापर्यंत ५६ हजार नागरिकांचा बळी गेला आहे.  संरक्षण मंत्रालयालावर आरोप केला जातो की, ते नागरिक आणि दहशतवादी असा भेद  करत नाही. काही धोकादायक आणि संशयास्पद वाटले की, ते  थेट गोळ्या झाडत आहेत. 

इस्रायलची खोड काढणे पडले महागात 

 
दोन वर्षांपूर्वी ७ ऑक्टोबर रोजी हमास दहशतवाद्यांनी इस्रायलवर पहिल्यांदा दहशतवादी हल्ला करुन इस्रायलची खोड काढली होती. त्यानंतर १ हजार २०० इस्रायली नागरिकांची निर्मम हत्या केली होती. त्यानंतर हमास दहशतवाद्यांना खात्मा होईपर्यंत कारवाई करण्याचा विडा इस्रायलने उचलला होता. नंतर संघर्षबंदी झाली. दहशतवाद्यांनी  काही ओलिसांची सुटका केली. अजूनही काही ओलिस त्यांच्या ताब्यात आहेत. त्यांची सुटका करावी, अशी मागणी इस्रायल करत आहे. त्याकडे दहशतवाद्यांनी दुर्लक्ष केले आहे. 

मदत साहित्य केंद्रे संरक्षित जागेत 

दहशतवादी हल्ल्यानंतर  इस्रायलने हवाई हल्ले करुन गाझा पट्टी उद्ध्वस्त केली. इमारतीची प्रचंड नासधूस झाली. तसेच काही भाग संरक्षित करुन तेथे इस्रायली सैन्याने आपला जम बसविला अहे. अशा ठिकाणी संयुक्त राष्ट्राच्या मदतीने मदत साहित्य वाटप केंद्रे  सुरू आहेत. तेथे अन्नासाठी पॅलेस्टिनी नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यासाठी  मारामार्‍या देखील करत आहेत. एकमेकाचे साहित्य पळवून नेत आहेत. लूटमारीचे आणि भोसक भोसकीचे प्रकार चोरटे करत आहेत. त्यामुळे परिसरात गोंधळ उडत असून सैनिक गोेंधळ घालणार्‍या नागरिकांना पांगविण्यासाठी गोळ्या झाडत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. 
 

Related Articles