माणगाव खोर्‍यात तरुण वाहून गेला   

सावंतवाडी : कुडाळ तालुक्यातील माणगाव खोर्‍यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वसोली-कुत्रेकोंड कॉजवेवरून एक दुचाकीस्वार पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे.अमित धुरी (वय ३०) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्यासोबत असलेला सहकारी सखाराम कानडे हा सुदैवाने बचावला आहे. ही घटना सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून, एनडीआरएफ पथकाकडून तरुणाचा शोध सुरू आहे.
 
माणगाव खोर्‍यातील सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे वसोली-कुत्रेकोंड कॉजवेवर मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. याच दरम्यान माणगावहून शिवापूरकडे मोटरसायकलने जात असलेले अमित धुरी आणि सखाराम कानडे यांनी कॉजवेवरील पाण्याचा अंदाज न घेता पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्याने त्यांची मोटरसायकल प्रवाहाने खाली ओढली गेली. यात अमित धुरी पुलाखालून वाहून गेला, तर त्याचा सहकारी सखाराम कानडे बचावला.
 
सखारामने तातडीने आरडाओरड केली, परंतु रात्रीची वेळ असल्याने त्याला कोणीही प्रतिसाद दिला नाही. अशा परिस्थितीतही त्याने जवळच्या वसोली येथील एका दुकानावर धाव घेतली आणि घडलेली घटना ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर परिसरात एकच धावपळ उडाली आणि आपत्कालीन यंत्रणांना घटनेची माहिती देण्यात आली.
 

Related Articles