मोसादने इराणमध्ये तैनात केलेली ‘ब्लॅक विडो’ कोण?   

इस्रायल आणि इराणमधील युद्धात अमेरिकेने उडी घेत इराणच्या तीन अणुकेंद्रांवर हल्ला केला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण आणि इस्रायलने एकमेकांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले वाढवले असतानाच इस्रायलने इराणवर हल्ला करण्यासाठी एका नवीन शस्त्राचा वापर केला. इस्रायलने त्यांची गुप्तचर संस्था मोसादची ब्लॅक विडो ही हेर इराणमध्ये तैनात केली आहे. या ब्लॅक विडोमुळे इराणचे अनेक अणुशास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकारी मारले गेले. तेव्हापासून इराणमध्ये भीती कायम आहे. 

ब्लॅक विडो

मोसादने इराणमधील त्यांच्या धाडसी मोहिमेसाठी एका महिला एजंटला तैनात केले आहे. कॅथरीन पेरेझ शेकेड असे या एजंटचे नाव असून, ती फ्रेंच वंशाची आहे. ती देखणी, हुशार आणि गुप्तचर प्रशिक्षणात तज्ज्ञ आहे. इराणमध्ये घुसखोरी करून तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि हळूहळू इराणच्या उच्च लष्करी अधिकार्‍यांच्या घरात पाहुणी म्हणून पोहचली. अधिकार्‍यांचा विश्वास जिंकल्यानंतर तेथील लष्कराची सर्व माहिती ती मोसादला देत राहिली.

नऊ शास्त्रज्ञ हनीट्रॅपचे शिकार 

मोसादचे हनीट्रॅपचे जाळे अत्यंत सशक्त आहे. मोसादमधील तरुणी आपल्या सौंदर्याच्या बळावर समोरच्या व्यक्तीला घायाळ करणे आणि त्याला जाळ्यात ओढणे यात तरबेज असतात. ब्लॅक विडो अशीच एक आहे. तिने मैत्री आणि प्रेमाचे नाटक करून इराणच्या नऊ शास्त्रज्ञांना आपल्या जाळ्यात ओढले.१३ जून रोजी इराणसोबत इस्रायलचे युद्ध सुरू झाले आणि या काळात तिने इराणच्या ९ अणुशास्त्रज्ञांचा जीव घेतला.

ब्लॅक विडोच्या सुचनेनुसार हल्ले  

जेव्हा इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढला, तेव्हा इराणी अधिकार्‍यांनी त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांची ठिकाणे बदलली; परंतु त्यांच्या सर्व कारवाया मोसादच्या या ब्लॅक विडोच्या देखरेखीखाली होत्या. तिच्या अचूक माहितीमुळे इस्रायलने इराणच्या अनेक उच्च लष्करी अधिकार्‍यांना आणि अणुशास्त्रज्ञांना अगदी सहजपणे मारले.

२४ इस्रायली हेरांना अटक 

ब्लॅक विडोच्या भीतीमुळे इराण मोसादच्या एजंटना पकडण्यात व्यस्त आहे.  इराण पोलिसांनी एक निवेदन जारी केले आहे की, आतापर्यंत इस्रायली गुप्तचर संस्थेशी संबंधित २४ जणांना अटक करण्यात आली आहे, ते इस्रायलसाठी हेरगिरी करत होते.
 

Related Articles