माळीण-पसारवाडी रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ता बंद   

मंचर,(प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी डोंगरी भागात असणार्‍या माळीण-पसारवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने पसारवाडी, कोकणेवाडीच्या पुढे जाणारा रस्ता बंद झाला. दरड कोसळल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. सुदैवाने येथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.        
                    
मागील आठवड्याभर झालेल्या मुसळधार पावसाने माळीण-पसारवाडी परिसरात थैमान घातले होते. ओढ्यानाल्यांना पावसाचा पूर गेला. सोमवारी पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान प्रचंड आवाज होऊन दरड कोसळून रस्त्यावर दगड-गोटे, मलमा आल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा माळीण दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली.  माळीण-पसारवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना माजी सरपंच दिगंबर भालचिंम यांच्या लक्षात आली. त्याबाबत त्यांनी सरपंच, ग्रामसेवक व प्रशासनाला कळविले. ग्रामपंचायतीचे सरपंच रघुनाथ झाजरे, ग्रामसेवक मिलिंद गारे, शिवाजी लेंभे व ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून पंचनामा केला असल्याचे समजते. माळीण, पसारवाडी, कोकणेवाडी येथून पुढे जाणारा रस्ता दरडीमुळे बंद झाला. रस्त्यावर कोसळेली दरड त्वरित काढावी. त्या माध्यमातून रस्ता खुला होऊन ठप्प झालेले दळणवळण सुरू होईल, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. लवकरात लवकर माळीणगावाच्या पसारवाडीच्या पुनर्वसनाच्या हालचाली व्हाव्यात. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. माळीण परिसरातील धोकादायक असणारी माळीण गावाची पसारवाडी गेल्या दहा वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. दरवर्षी पावसाळ्यात पसारवाडीतील ग्रामस्थांच्या स्थलांतराबाबत प्रशासनाकडून व नागरिकांमध्ये चर्चा होत असते. प्रत्यक्षात अद्यापही पुनर्वसनाबाबत कोणत्या हालचाली झाली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. 
 

Related Articles