पावसाच्या सरीत सोपानकाकांच्या पालखीचे प्रस्थान   

निलेश जगताप

सासवड : टाळ-मृदंगाचा गजर, राम कृष्ण हरीचा अखंड घोष, संतांच्या पालख्यांमागे चालणार्‍या वैष्णवांचा ओसंडून वाहणारा उत्साह, आणि आषाढी वारीची अनंत परंपरा या भक्तिपथावर सोमवारी सासवड नगरीतून संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्याने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू असलेल्या सोपानकाकांचा हा पालखी सोहळा यंदा १२२ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
 
सोमवारी सकाळी देऊळवाड्यातून प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली आणि दुपारी सासवडमधील संत सोपानकाकांच्या समाधी मंदिराच्या देऊळवाडा परिसरातून पालखीने प्रस्थान केले. यावेळी सासवड नगरी भक्तिरसात न्हालेली होती. रिमझिम पाऊस, फुलांची उधळण, भजनांचा गजर, वारीचा साजशृंगार, ढोल-ताशांच्या निनादात एक वेगळीच भक्तीमयवातावरण शहरात अनुभवायला मिळाले. सासवड शहरातील प्रत्येक चौक, गल्लीतून संत सोपानकाका महाराज की जय!, माऊली माऊलीचा जयघोषाचा निनाद ऐकू येत होता.
 
ही केवळ एक परंपरा नाही, हा आत्मिक प्रवास आहे. संतांच्या पावलावर पाऊल ठेवत, भक्तीचा गजर करत सोपान काकांची पालखी आता पुन्हा एकदा ’माऊली’च्या पंढरीच्या दिशेने निघाली आहे-भाविकांच्या श्रद्धा आणि समर्पणाच्या ओंजळीतून... हजारो भाविक, मानकरी, आणि संतसेवा संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग होता. 
 
या सोहळ्याला हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. सोहळ्याच्या प्रस्थान प्रसंगी पुरंदरचे आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप यांनीही पालखीचे दर्शन घेतले. सोपानकाका बँकेच्या वतीने माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सर्व दिंडीप्रमुखांस श्रीफळ देण्यात आले.
 
संत सोपानकाकांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी  देवस्थानचे प्रमुख  त्रिगुण गोसावी, विविध प्रशासकीय विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. विविध संस्थानांचे प्रतिनिधी, मानकरी, वारकरी मंडळी यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. वारकर्‍यांच्या हातात पताका, मुखात हरिनाम, आणि डोळ्यांत विठूरायाच्या दर्शनाची आस होती.

पंढरीच्या वाटेवर १३ मुक्काम

यंदा या वारीत एकूण १३ मुक्कामांचा समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे १४ मुक्काम होणार नाहीत यावर्षी माळेगावचा मुक्काम होणार नाही. यंदा १३ दिवसांत  हा प्रवास पूर्ण होणार असून, साधारण १८० किलोमीटरचे अंतर पार केले जाणार आहे. आजचा पहिला मुक्काम वीर मार्गे पांगारे येथे होणार आहे.

माऊलींचा निरोप, बंधूंचे प्रस्थान 

रविवारी दिवे घाट सर करून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडमध्ये दाखल झाली होती. सोमवारी त्यांचा मुक्काम सासवड येथे आहे. त्याचवेळी त्यांच्या लाडक्या धाकट्या बंधूंची संत सोपान काकांची पालखी सासवडमधून प्रस्थान करत आहे. ही परंपरा म्हणजे भावनिक आणि अध्यात्मिक वारशाचा अनमोल धागा आहे.

रिंगणात बदल, तरी भक्तीचा उत्सव कायम

वारीमध्ये दरवर्षी दोन उभे आणि दोन गोल रिंगण असतात. मात्र यंदा तिथीच्या अडचणीमुळे माळेगावमधील उभं रिंगण होणार नाही. तरीही उर्वरित रिंगणांचा सोहळा पारंपरिक पद्धतीने होणार आहे. सोहळा प्रमुख गोसावी यांनी ही माहिती दिली.

सोपानकाका समाधी स्थान-श्रद्धेचे केंद्र

सासवड हे संत सोपानकाकांचे समाधी स्थान आहे. इथे दरवर्षी पालखी प्रस्थानापूर्वी पूजा, आरती आणि कीर्तनसेवा होते. संपूर्ण वारीत या परंपरेला विशेष महत्त्व आहे. सासवडमधून निघालेली ही पालखी पंढरपूरला पोहचूनच विसावणार आहे.
 

Related Articles