इंटरसिटी बस आरक्षणामध्ये २० टक्क्यांनी वाढ   

मुंबई : राज्यात इंटरसिटी बस आरक्षणांमध्ये चालू आर्थिक वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढ झाली.  ‘रेडबस’ या ऑनलाइन बस तिकिट बुकिंग व्यासपीठाने सादर केलेल्या आपल्या वार्षिक ‘बस ट्रॅक रिपोर्ट’मधून ही माहिती समोर आली आहे.  या अहवालानुसार महाराष्ट्रात पुणे-गोवा, पुणे-हैदराबाद, पुणे-इंदूर आणि मुंबई-हैदराबाद हे सातत्याने प्रवास केले जाणारे मार्ग ठरले आहेत. पश्चिम व दक्षिण भारताशी महाराष्ट्र केंद्रस्थानी जोडले गेले आहे, हे या माध्यमातून अधोरेखित झाले.  तर, ४९ टक्के प्रवाशांनी प्रवासाच्या दिवशीच बसचे आरक्षण केले व  ४६ टक्के प्रवाशांनी एक ते सात दिवस आधी आरक्षण केले. या अहवालानुसार महाराष्ट्रातील तृतीय श्रेणी शहरांतील ऑनलाइन बस आरक्षणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत २३ टक्क्यांनी वाढ झाली.  डिजिटल पद्धतींचा अवलंब प्रथम व द्वितीय श्रेणी शहरांपलिकडेही होऊ लागला आहे, हे यातून स्पष्ट होते. तसेच या अहवालानुसार, महाराष्ट्रातील प्रवाशांनी स्लीपर बस (८७ टक्के) आणि वातानुकूलित बस (८२ टक्के) यांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अधिक आरामदायी व रात्री प्रवास करण्याचे पर्याय निवडले जात असल्याचे अधोरेखित होते.
रेडबसच्या मुख्य विपणन अधिकारी पल्लवी चोप्रा म्हणाल्या , महाराष्ट्रातील शहरांतर्गत प्रवासाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. प्रवाशांचा आरामदायी पर्यायांकडे ओढा, प्रवास नियोजनातील लवचिकता आणि डिजिटल सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अवलंब यामुळे हे क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे.
 

Related Articles