डॉ. सबनीस यांच्या वैचारिक भूमिकेचा महाराष्ट्र ऋणी   

शरद पवार यांचे मत 

पुणे : वडिलांकडून मिळालेला सशस्त्र क्रांतीचा वारसा डॉ. श्रीपाल सबनीस त्यांच्या लेखणीद्वारे पुढे नेत आहेत. त्यामुळे समतोल वैचारिक भूमिका मांडणार्‍या डॉ. सबनीस यांचा महाराष्ट्र कायम ऋणी राहिल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले.         
                                        
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा आणि साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रात कार्य करणार्‍या ७५ संस्थांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त टिळक स्मारक मंदिर येथे गौरव समारंभ पार पडला. यावेळी पवार बोलत होते. याप्रसंगी पवार यांच्या हस्ते डॉ. सबनीस यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भूषविले. 
 
प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, खासदार ओमराजे निंबाळकर, मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल, आमदार कैलास पाटील, ललिता श्रीपाल सबनीस, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेचे अध्यक्ष सचिन ईटकर, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेचे उपाध्यक्ष रवींद्र डोमाळे, कादंबरीकार विश्वास पाटील, सुनील महाजन आदी उपस्थित होते.
 
डॉ. श्रीपाल सबनीस लिखित ’विवेकाची पेरणी’ आणि राजकारणाचा पंचनामा आणि सुनिताराजे पवार संपादित ’विवेकवादी डॉ. श्रीपाल सबनीस : विचार आणि वारसा’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. पवार म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अध्यक्षीय भाषण मांडून श्रीपाल सबनीस थांबले नाही, तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत विचारांचे स्फुल्लिंग चेतवले. टीका किंवा स्तुती करताना सबनीस यांची लेखणी कधी कचरली नाही. त्यांनी टीकाही मोकळेपणाने केली, तर स्तुती देखील मोकळेपणाने केली. सबनीस यांच्या लेखनाचा पींड पाहता खूप वरच्या दर्जाचे लेखक म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. अन्यायाविषयी प्रचंड चीड असलेले सबनीस यांनी साहित्य क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवून ते वाटचाल करीत असून सामाजिक प्रश्नांची त्यांना खोल जाणीव आहे. त्यांच्या लेखनात शोषित, पीडित आणि वंचितांच्या वेदनांना वाचा फुटताना दिसते. तर, नव्या युगाच्या आशाही ते पेरत असतात. 
 
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, शरद पवार यांनी ज्या प्रमाणे राजकारणातील एक पिढी घडवली, त्याच धरतीवर डॉ. श्रीपाल सबनीस यांनी लेखणीच्या माध्यमातून एक पिढी घडवली आहे. आपल्या शिक्षकी भूमिकेतून ते सतत व्यक्त होत राहिले. लेखणीच्या माध्यमातून ते विचार देत राहिले. 
 
सत्काराला उत्तर देताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, उजव्या आणि डाव्या दोघांच्या वैचारिकतेचा सुवर्णमध्य साधत मी माझा लेखनधर्म प्रामाणिकपणे राबविला आहे. कर्मकांड मांडणारा धर्म मी कधीही मानला नाही. डाव्या आणि उजव्या विचारांच्या लढाईत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उजव्यांचे प्राबल्य वाढत आहे, हे खेदाने नमूद करावेसे वाटते. हिटलर मेलेला नसून तो आजही विविध रूपांमध्ये जीवंत आहे, हे वारंवार सिध्द होते. सत्ता ही सत्याचे साधन झाले पाहिजे, मात्र ते होताना दिसत नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेचे अध्यक्ष सचिन ईटकर यांनी केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. विराज तावरे यांनी आभार मानले. 

Related Articles