नर्‍हे परिसरात नागरिकांचे चक्काजाम आंदोलन   

पुणे : नर्‍हे परिसरातील नागरी समस्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी धायरी फाटा-नर्‍हे रस्त्यावर कृष्णाईनगर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडून आणि घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्क्रीयतेचा निषेध करण्यात आला.
 
रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये गुलाबाची रोपे लावून गांधीगिरीच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. मात्र, त्याचीही दखल न घेतल्यामुळे चक्काजामचा आंदोलन करण्यात आले असल्याचे मोरे यांनी सांगितले. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांत तीव्र नाराजी निर्माण झाली होती. आंदोलनाच्या तीन तासांनंतरही जबाबदार अधिकार्‍यांनी घटनास्थळी न पोहोचल्यामुळे संतप्त नागरिकांनी चक्काजाम अधिक तीव्र केला. शेवटी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या उपायुक्त श्रद्धा पोतदार, अभियंते विजय वाघमोडे, निशिकांत छापेकर, कोलते, शुभम देशमुख यांनी घटनास्थळी येऊन मोरे यांच्या मागण्यांवर तातडीने कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
 
भूपेंद्र मोरे यांनी नर्‍हे परिसरातील ड्रेनेज लाईन, खड्डे, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी व पाणीपुरवठा या समस्या तातडीने सोडवाव्यात, अन्यथा पुढील आंदोलनात मुंबई-बेंगळूर महामार्ग रोखण्यात येईल, असा इशारा दिला.या वेळी राजाभाऊ जाधव, मिलिंद मराठे, संजय सुर्वे, गणेश निंबाळकर, विठ्ठल सूर्यवंशी, हरीश वैद्य, प्रशिक दारुंडे, लतिफ शेख, सुनील पडेर, सुरज दांगडे, सुशील भागवत, विशाल खरात, बोराडे, अजय घारे, सोनाली नायर आदी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दायगुडे, वाहतूक शाखेचे राजकुमार बर्डे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
 
भूपेंद्र मोरे म्हणाले, सातत्याने निवेदने देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. गांधीगिरी केल्यानंतरही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे नाईलाजाने नागरिकांच्या सोबत रस्त्यावर उतरून चक्काजाम करावा लागला. समस्या तातडीने सोडवण्यात आल्या नाहीत तर बेंगळूर-मुंबई महामार्ग रोखण्याची तयारी ठेवल्याशिवाय पर्याय नाही.

Related Articles