पहिलीपासून हिंदीला अजित पवारांचाही विरोध   

महायुतीतच मतभेद!

मुंबई, (प्रतिनिधी) : पहिलीपासून हिंदीचा निर्णय घेऊन सरकारने वादाचे मोहोळ उठवलेले असताना, यावरून सत्ताधारी महायुतीत एकवाक्यता नसल्याचे चित्र पुढे आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिलीपासून मुलांवर तिसर्‍या भाषेचे ओझे टाकणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. मनसेने त्याचे फलकही लावले आहेत.
 
पहिलीपासून हिंदीची सक्ती तर नकोच, पण ऐच्छिक म्हणूनही हा विषय ठेऊ नये, अशी आक्रमक भूमिका घेत विरोधक मैदानात उतरले आहेत. सरकारकडून आपल्या निर्णयाचे समर्थन केले जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे. पाचवीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय योग्य आहे. पहिलीपासून हिंदी विषय शिकवून विद्यार्थ्यांवर त्याचे ओझे टाकू नये, असे मत अजित पवार यांनी नुकतेच व्यक्त केले होते. काल त्याचा पुनरुच्चार करताना मंत्रीमंडळ बैठकीत यावर चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या पक्षाचे युवा नेते सूरज चव्हाण यांनीही समाज माध्यमावरून पहिलीपासून हिंदीला विरोध केला.

Related Articles