महापालिकेचा अभ्यागत कक्ष सोमवारीच सुरू राहणार   

आयुक्त महिन्याच्या पहिल्या सोमवारी तक्रारी ऐकून घेणार

पुणे : महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नवल किशोर राम यांनी अवघ्या तीन आठवड्यात माजी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या सोडविण्यासाठी सुरू केलेल्या अभ्यांगत कक्षाच्या कामकाजात बदल केला आहे. त्यामुळे यापुर्वी आठवड्याच्या प्रत्येक सोमवार आणि गुरूवारी सुरू ठेवण्यात येणारा हा अभ्यांगत कक्ष यापुढे फक्त आठवड्यातून एकदाच अर्थात तोही प्रत्येक सोमवारी दुपारी चार ते साडेपाच या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. या आदेशानुसार आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी हा अभ्यांगत कक्ष सुरू राहील. दुपारी चार ते साडेपाच या वेळेत नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या  सोडविण्यासाठी पावले उचलण्यात येतील. महिन्याच्या पहिल्या सोमवारी स्वत: आयुक्त उपस्थित असतील. तर पुढील तीन सोमवारी अतिरिक्त आयुक्त उपस्थित राहाणार आहेत. यापुर्वीच्या तक्रारींच्या अनुभवावरून अतिक्रमण, बांधकाम, पाणी पुरवठा आणि मिळकत कर विभागाचेच अधिकारी या बैठकींना उपस्थित राहाणार आहेत.
 
प्रशासक राजमध्ये नागरिकांच्या तक्रारी थेट अधिकार्यांकडे येत आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी संबधित खोतप्रमुखांकडून विलंब होत असल्याने नागरिक थेट अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांकडे जातात. यामुळे अति वरिष्ठ अधिकार्यांचा बहुतांश वेळ या भेटींसाठी जात असल्याने अन्य नियोजनाच्या बैठका, नेत्यांच्या दौर्यांतील उपस्थिती, मंत्रालयातील बैठका अशा अगोदरपासूनच हेव्ही शेड्यूलमधून नागरिकांना वेळ देण्यात दमछाक होत असल्याने माजी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अभ्यांगत कक्ष ही संकल्पना पुढे आणली. आठवड्याच्या प्रत्येक सोमवार आणि गुरूवारी दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेउन संबधित विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत रुजवात घालून पाठपुरावा आणि तक्रारींची सोडवणूक करावी, असा यामागील उद्देश होता. या अभ्यांगत कक्षाची जबाबदारी ही उपायुक्त दर्जाच्या अधिकार्याकडे देण्यात आली होती.
 
मागील साधारण पाच ते सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाची रिव्हीजन करून त्यामधे बदल करण्याचा निर्णय नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतला आहे. त्यामुळे यापुढे फक्त सोमवारी आणि तेही चार ते साडेपाच असा दीड तासच हा अभ्यांगत कक्ष सुरु ठेवण्यात येणार आहे.
 

Related Articles