पोलिसांच्या सिग्नल फ्री, यु-टर्न संकल्पनेला नागरिकांचा विरोध   

संतप्त नागरिकांकडून नगर रस्त्यावर फलकबाजी

पुणे : नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा रस्ता सिग्नल मुक्त करण्यात आला आहे, परंतु येरवडा ते खराडी जुना जकात चौकदरम्यान वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या सिग्नल फ्री आणि यु-टर्न संकल्पनेच्या विरोधात संतप्त नागरिकांनी फलकबाजी केली आहे. साहेब... नगररोड ओलांडायचा कसा?,  चुकलेल्या यु-टर्नचा त्रास सहन का करायचा? कोणी वालीच नाही... असे फलकवर नमूद करुन नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.
 
नगर रस्त्यावर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रस्त्यावरील आठ सिग्नल बंद केले आहेत. या प्रयोगामुळे वाहतूकीचा वेग वाढल्याचा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे, परंतु चौक बंद करुन यु-टर्न घेण्यासाठी मोकळीक दिलेल्या ठिकाणांवर वाहन चालकांच्या सुरक्षिततेचे कोणतेही उपाय केले नाहीत. तर रस्त्यावर पहिला हक्क असलेल्या पादचार्‍यांना रस्त्यावर चालण्यासाठी साधी जागा शिल्लक ठेवलेली नाही. असा आरोप केला असून पुणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांवर संताप व्यक्त केला जात आहे. यु-टर्न घेताना मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जाऊ लागला आहे.
 
शास्त्रीनगर चौक बंद करून आगाखान पॅलेससमोर, रामवाडी हायात चौक, मेट्रो स्टेशन समोर, विमाननगर व सोमनाथनगर चौक, आगानगर हॉटेल उपाला समोर, टाटागार्डरूम चौक, महानगर बँकेसमोर, खुळेवाडी फाटा, तसेच चंदननगर भुयारी चौक आणि चंदननगर बायपास चौक बंद करून थेट खराडी जुना जकात नाका येथे यु-टर्नची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या प्रयोगामुळे रस्ते ओलांडण्यासाठी पादचार्‍यांसाठी कोणतीही सुरक्षित सोय करण्यात आलेली नाही, परिणामी नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ते ओलांडावे लागत आहेत. स्थानीय नागरिक, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि महिला यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या निर्णयामध्ये स्थानिक नागरिक व प्रतिनिधींना विश्वासात न घेता केवळ प्रयोग म्हणत घेतलेले हे पाऊल नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण करणारे ठरले आहे. असा आरोप करुन वाहतूक पोलिसांवर संताप व्यक्त केला आहे. या विरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रमोद देवकर, अनिल गलांडे आणि करीम शेख यांनी ’नगररोड ओलांडायचा कसा?’ या सवालासह यु-टर्नच्या ठिकाणी फलक लावून पुणे वाहतूक विभागाला जाब विचारला आहे.
 
पादचार्‍यांना जागा द्या...
 
नगर रस्त्यावरील धोकादायक बीआरटी काढण्यासंधर्भात वेळोवेळी केलेली आंदोलने केली. पोलीस वाहतूक विभागामार्फत सादर केलेले योग्य अभिप्राय यामुळे प्रशासनाकडून बीआरटी काढण्यात आली. परंतु तात्काळ संपूर्ण धोकादायक बीआरटी मार्ग निघणे गरजेचे होते, परंतु तसे न होता फक्त बीआरटी बस थांबे काढण्यात आलेले आहे.त यामुळे रस्ते मोठे होऊन सुद्धा वाहतूक सुरळीत होत नाही आहे. त्यामुळे बीआरटी काढण्याच्या मुख्य उद्देशालाच फाटा देण्यात आला आहे. यामुळे वाहतुकीचा मार्ग तेवढाच राहिलेला असून यु-टर्न घेणार्‍या वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. अन यामुळेच एकाच बाजूच्या वाहतुकीवर याचा प्रचंड ताण येत असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी सुरक्षित मार्ग नाही आहे. किमान त्यांना चालण्यासाठी जागा देणे आवश्यक आहे. अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
 
नगर रस्त्यावर राबविण्यात येत असलेला प्रयोग हा उत्तम असून यामुळे वाहतूकीचा वेग वाढला आहे. स्थानिक नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, याची जाणीव आहे. या रस्त्यावरील ८ सिग्नल बंद केले आहेत.  यामुळे १५ मिनिटांचा वेळ वाचत आहे. युटर्न घेण्यात येणारी ठिकाणी आता निश्चित झाली असून त्याची सवय नागरिकांना पडली आहे. आता वाहतूक कोंडी होत नाही. रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्गाचा पादचार्‍यांनी वापर करावा. पादचार्‍यांसाठी २० सेकेंदाचा सिग्नल देण्यात आला आहे. महापालिकेला कायम स्वरुपी उपाय योजना करण्यासाठी पत्र दिले आहे.
 
 - अमोल झेंडे, उपायुक्त, पुणे वाहतूक पोलीस विभाग.

Related Articles