इराणवरील हल्ल्याच्या जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया   

दोन देशांची संयुक्त कारवाई चिंताजनक : संयुक्त राष्ट्र

दोन देशांची संयुक्त सैन्य कारवाई चिंतित करणारी आहे. नागरिकांसाठी, प्रदेशासाठी आणि जगासाठी विनाशकारी परिणामांसह हा संघर्ष वेगाने नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका वाढत आहे. लष्करी कारवाई हा उपाय नाही. यातून पुढे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे राजनैतिकता आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे  महासचिव एन्टोनिओ गुटेरेस यांनी म्हटले आहे. 

लष्करी हस्तक्षेप अनपेक्षित परिणाम करतील : चीन

अमेरिकेचे हल्ले एक धोकादायक वळण आहे. इतिहासाने वारंवार दाखवून दिले आहे की, मध्य पूर्वेतील लष्करी हस्तक्षेप अनेकदा अनपेक्षित परिणाम निर्माण करतात. त्यामुळे दीर्घकाळ संघर्ष आणि प्रादेशिक अस्थिरतेचा अमेरिकेला सामना करावा लागू शकतो, असे २००३ मध्ये इराकवरील अमेरिकेच्या आक्रमणाचा हवाला देत चीनने म्हटले आहे. लष्करी संघर्षापेक्षा संवादाला प्राधान्य देणारा राजनैतिक दृष्टिकोन मध्य पूर्वेतील स्थिरतेसाठी सर्वोत्तम ठरेल. 

इराणला अण्वस्त्रे देण्यास तयार : रशिया  

अमेरिकेने शनिवारी मध्यरात्री बी-२ बॉम्बर्सच्या सहाय्याने इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या तीन ३ अणुकेंद्रांवर हल्ला केला. त्यानंतर ही अणुकेंद्रे उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेने केला. दरम्यान, अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर आपण आज (सोमवारी) मॉस्को येथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटणार असल्याचे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, रशिया इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार आहे, असे रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या नेतृत्वाने इतिहास घडवला : इस्रायल

इराणसोबतच्या युद्धात इस्रायलने खरोखरच उल्लेखनीय काम केले आहे; पण  शनिवारी मध्यरात्री अमेरिकेने इराणच्या अणु केंद्रांवर हल्ला करून उत्तम काम केले. जगातील इतर कोणताही देश करू शकत नाही. इराणच्या अणुप्रकल्पांना लक्ष्य करण्याचा ट्रम्प यांचा हा धाडसी निर्णय इतिहास बदलेल. पश्चिम आशियाला अधिक समृद्धी आणि शांततेकडे नेण्यास त्यांचा हा निर्णय मदत करू शकतो, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे. 

आम्हाला संघर्षात पडायचे नाही : लेबानन 

लेबनानला कोणत्याही देशांच्या संघर्षामध्ये पडायचे नाही. आमच्यासाठी  राष्ट्रीय हिताचे पालन करणे महत्त्वाचे आहे, लेबनानला कोणत्याही प्रकारे चालू क्षेत्रीय संघर्षात सामील होण्यापासून दूर राहायचे आहे, असे लेबनान प्रधानमंत्री नवाफ सलाम यांनी सांगितले. 

राजनैतिक मार्गाने प्रश्न सोडवावा : ऑस्ट्रेलिया 

इराणचा अणु आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी धोका आहे. या क्षेत्रातील सुरक्षा परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे. त्यामुळे इराण आणि इस्रायलने शांततेच्या आणि राजनैतिक मार्गाने प्रश्न सोडवावा, असे ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.

Related Articles