मुनीर यांच्याकडे पाकिस्तानमधील क्रिप्टो व्यवसायाची जबाबदारी?   

इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबाचा क्रिप्टो व्यवसाय सांभाळणार आहेत. या क्रिप्टो कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी ट्रम्प यांनी अलीकडेच डिनर डिप्लोमसीचा भाग म्हणून मुनीर यांना व्हाइट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते.
 
पाकिस्तानच्या १७ हजार कोटी रुपयांच्या क्रिप्टो व्यवसायासाठी पाकिस्तान क्रिप्टो कौन्सिलने ट्रम्प कुटुंबाचे वर्चस्व असलेल्या वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियलसोबत करार केला आहे. ट्रम्प आणि मुनीर यांच्यातील करारात पाकिस्तानी-अमेरिकन व्यापारी साजिद तरार हे एक महत्त्वाचे पात्र आहे. रिपब्लिकन पक्षाशी संबंधित तरार, वित्त आणि रिअल इस्टेट फर्म चालवतात. मुनीर यांना जेवणासाठी आमंत्रित करण्यातही तरार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 
 
ट्रम्प कुटुंब पुढील दोन वर्षांत पाकिस्तानमधील क्रिप्टो व्यवसाय दुप्पट करून ३४ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची योजना आखत आहे. मुनीर पाकिस्तानमधील क्रिप्टो व्यवसाय ताब्यात घेतील. ऑपरेशन सिंदूरनंतर मुनीरने केलेल्या युद्धबंदीसाठी ट्रम्पकडून मिळालेले हे बक्षीस मानले जात आहे. पाकिस्तान सरकारनेही क्रिप्टो व्यवसायासाठी अनुकूल धोरणांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे.
 
क्रिप्टो चलनात असलेल्या ब्लॉकचेनच्या जटिलतेमुळे व्यवहारांचा मागोवा घेणे कठीण होते. याचा फायदा घेऊन बेकायदेशीर दहशतवादी निधी लपवता येतो. पाकिस्तानला दक्षिण आशियाची क्रिप्टो राजधानी बनवण्याची योजना ट्रम्प यांनी आखली आहे.  
 
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराचा व्यवसाय  जवळपास २.२५ लाख कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे मुनीर लष्कराच्या व्यवसायाच्या उत्पन्नाचा एक भाग क्रिप्टो करन्सीमध्ये देखील गुंतवू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Related Articles