पाकिस्तानचा बुरखा फाटला   

अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर ओवेसी यांची प्रतिक्रिया

मुंबई : इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. शनिवारी रात्री अमेरिकेच्या बी-२ बॉम्बर विमानांनी इराणच्या अणुकेंद्रांना लक्ष्य केले. इराणवरील या हल्ल्याचे आदेश देणार्‍या ट्रम्प यांना शांततेचा नोबल पुरस्कार दिला जावा, अशी चार दिवसांपूर्वीच पाकिस्तान शिफारस करत होता. त्यासाठीच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर ट्रम्प यांना भेटले होते का? पाकिस्तानचा बुरखा आता फाटला आहे, अशी टीका एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. 
 
ओवेसी म्हणाले, अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यासाठी पाकिस्तानने ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्याची मागणी केली होती का? या हल्ल्यासाठीच असीम मुनीर ट्रम्प यांना भेटले होते का? आता त्यांचा पर्दाफाश झाला आहे. पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे पाकिस्तानवर टीका होऊ लागली असून, ट्रम्प यांचा उदोउदो करणार्‍या पाकिस्तानवर मुस्लीम राष्ट्रे टीका करत आहेत.
 
दरम्यान, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले करून फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानमधील तीन अणुऊर्जा प्रकल्पांचा लक्ष्यभेद केला. या पाठोपाठ इराणने त्यांच्या अणऊर्जा प्रकल्पांवर हल्ले झाल्याचे जाहीर केले आहे. मात्र, या हल्ल्यात कोणतेही मोठे नुकसान झाले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेने उडी घेतल्यामुळे या युद्धाची व्यापकता वाढली असून, जग मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर आल्याची चर्चा आहे.
 

Related Articles