व्हॉट्सऍप कट्टा   

एक लक्षात ठेवायचं...
 
गाडीला पहिली किक मारतेय तितक्यात उंबर्‍यावर उभं असलेल्या आजीने ‘किक’ मारलीच. फरक इतकाच की ती किक शब्दांची होती. अपूर्वा, एक सांगू का? आपण कितीही नियमाने गाडी चालवली तरी इतर वाहनचालक त्यांच्या पद्धतीने वाहन चालवणार. भोगतो आपण. तेव्हा लक्षात काय ठेवायचं? सावधपणे गाडी चालवायची. रस्ता कधीही, कोणालाही माफ करत नसतो?
अपूर्वाने लोलकासारखी मान हलवली आणि सुरेखसं वळण घेऊन ती दिसेनाशी झाली. खिडकीतून ही सूचना वजा आर्जव ऐकताना मला जाणीव झाली की मी खरंचच तशी, मी खूप ‘श्रीमंत’ आहे. इतक्या मौलिक गोष्टी मला अनेक हितचिंतकांनी सांगितल्या आहेत. कोणी अनुभवातून,
कोणी काळजीपोटी तर कधी ते आपल्याला जवळून ओळखत असल्याने , विश्वासाची वानवा म्हणून !!
तरीपण....
त्यात आस्था असते.
आपुलकी असते.
प्रेम तर असतंच....
तर या ’एक लक्षात ठेवण्यातून...’
जवळची करंडी हलवून हलवून गच्च भरलीय. आता नवीन- करंडी...
कशाने भरलीय करंडी सांगते ना , 
एक-दोन ‘लक्षात ठेवलेले’ मुद्दे सांगते. 
त्या दिवशी शेजारचे भिडेकाका योग्यवेळी येऊन पोहोचले होते , जेव्हा उजव्या हाताच्या दोन बोटांत (अंगठा व मधलं बोट) मी घसा धरला होता.
अप्पू, डॉक्टरांकडे चाललीयेस वाटतं? एक लक्षात ठेव, डॉक्टरांना सगळं खरं खरं सांगायचं. नो लपवालपवी. नो थापा. तरच ‘औषधी’ गुण येतो. सॉरी औषधाचा गुण म्हणायचंय मला.
कळलं. भिडेकाका भा.पो. मी दुखर्‍या घशातूनही हसले.   
पहिल्या परदेश विमान प्रवासाचे वेळी माझी आत्त्या शुभेच्छा द्यायला आली. ‘बाय बाय,’ ‘टाटा’ सोबत डोळ्यात डोळे घालून म्हणाली , ‘’ अप्पूडी ग ,एक लक्षात ठेवायचं- विमानात  आपला ’पासपोर्ट’ नीटपणे सांभाळायचा आणि जपायची आपली संस्कृती !!  उंचावलेल्या माझ्या भुवया पाहून हसून बोलली,  बाकी वेगळं काही नाही गं, आपले रीती रिवाज  इमानाने आचरणात आणायचे. हं!
प्रवास सुखाचा होईलच  होय म्हणत मी पासपोर्टची छोटी स्लिंग बॅग गळ्यात अडकवली. या सगळ्या बेरजा झाल्या करून ! आता एवढ्यावरच समाधान मानावं की काय? 
’घेता घेता देणार्‍याचे हात घ्यावे’ असं आपल्या कविवर्य करंदीकरांनी सांगून ठेवलंय जे मी विसरू शकत नाही. आणि... मला ’ते’ अचानक सापडलं. आकाशला, माझ्या आठवीतल्या लेकाला, प्रचंड टेन्शन आलं होतं. कसलं? स्पर्धेतल्या भाषणाचं. भाषण संस्कृतमधून करायचं होतं. टिचरनी ते लिहून दिलं होतं. सरावही झाला होता. तरी जीव घाबरा-घुबरा! त्याला कसा धीर द्यावा, समजत नव्हतं. एकदम त्याला म्हटलं, आकाश, आत्मविश्वासानं उभं राहयचं बघ. एक लक्षात ठेवायचं, अशा भांबावल्या वेळी आपणच आपला ’दोस्त’ व्हायचं. आपला,  ’आतला आवाज’ साथ देत असतो. तो ’स्वर’, स्वरयंत्रातून उमटत नाही, ओठांवर रेंगाळत नाही. फक्त मनाला कंपनं जाणवतात. हा ’आतला आवाज’ असतो.
हा प्रामाणिक ’स्वर’ असतो.
पारदर्शी असतो.
तुमच्या भाषेत ‘गट’फिलिंग असते ते!
पापण्या मिटत-
आकाश मोकळा हसला.
आता माझेही ओठ विलगले.
 
- कविता मेहेंदळे
मो. ९३२६६ ५७०२७

Related Articles