इराणमधील भारतीयांना बाहेर काढण्याचे काम सुरू   

तेहरान/नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान भारत इराणमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना बाहेर काढत आहे, असे इराणमधील भारतीय दूतावासाने सांगितले. दरम्यान, ‘ऑपरेशन सिंधू’ अंर्तगत  आतापर्यंत ५०० हून अधिक भारतीय नागरिक इराणमधून मायदेशी परतले आहेत.इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना संपर्कासाठी भारतीय दूतावासाने ‘एक्स’ या समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि टेलिग्राम चॅनेलची लिंक दिली आहे.  
 
भारतीय दूतावास इराणमधील सर्व भारतीय नागरिकांना बाहेर काढत आहे. दूतावासाशी टेलिग्राम चॅनेलवर किंवा आपत्कालीन संपर्क क्रमांकांवर संपर्क साधता येईल. भारतीय नागरिकांनी +९८९०१०१४४५५७, +९८९१२८१०९११५ + ९८९१२८१०९१०९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.नेपाळ आणि श्रीलंकेतील नागरिकांचीदेखील सुटका केली जात आहे, असेही भारतीय दूतावासाने म्हटले आहे. यासाठी नेपाळ आणि श्रीलंका सरकारने भारतास विनंती केली आहे. भारताने ही विनंती मान्य केली असून इराणमधील नेपाळ आणि श्रीलंकेतील नागरिकांनी टेलिग्राम चॅनेलवर किंवा आपत्कालीन संपर्क क्रमांकांवर तातडीने संपर्क साधावा, असेही दूतावासाने म्हटले आहे. इराणमध्ये १०० श्रीलंकेचे नागरिक असून इस्रायलमध्ये २० हजारांहून अधिक श्रीलंकेचे नागरिक आहेत.

Related Articles